तंत्रशास्त्र विद्यापीठात ऑनलाइन पेपर तपासणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

'बाटू'चा निर्णय; तीस दिवसांत निकाल
लोणेरे (जि. रायगड) - राज्याच्या तंत्रशास्त्र विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी आता ऑनलाइन होणार आहे. झटपट आणि पारदर्शक निकालासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

'बाटू'चा निर्णय; तीस दिवसांत निकाल
लोणेरे (जि. रायगड) - राज्याच्या तंत्रशास्त्र विद्यापीठातील उत्तरपत्रिका तपासणी आता ऑनलाइन होणार आहे. झटपट आणि पारदर्शक निकालासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) मार्च 2016 पासून हे तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात राज्यभरातून 63 महाविद्यालये संलग्न झाली आहेत. त्यापैकी 48 अभियांत्रिकी, 12 औषधनिर्माणशास्त्र आणि चार वास्तुशास्त्र महावियालये संलग्न आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांत समन्वय, सुसूत्रता राहावी यासाठी राज्याचे तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन केले. यासाठी "बाटू'अंतर्गत चार प्रमुख विभागीय केंद्रे असतील तर पाच उपकेंद्रे असतील. सर्व केंद्रे आणि उपकेंद्रांत समन्वय राखण्यासाठी विद्यापीठ "ई- गव्हर्नन्स' पद्धतीवर भर देत आहे.

राज्यभरातील 63 महाविद्यालयांत परीक्षा घेणे हे जिकिरीचे काम; मात्र विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या "डिजिटल इव्हॅल्यूएशन सिस्टीम'ने (डीईएस) ते काम सोयीचे होणार आहे. या पद्धतीची अंमलबजावणी अगोदरच "बाटू'मध्ये सुरू झाली आहे. याद्वारे आतापर्यंत तब्बल 15 हजार उत्तरपत्रिका स्कॅन करून झाल्या आहेत. "डीईएस' पद्धत एकाच वेळी सर्व संलग्न झालेल्या महाविद्यालयांमध्ये अंमलबजावणी करणारे "बाटू' हे पहिले विद्यापीठ असेल.

"डीईएस' प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी संलग्न झालेल्या महाविद्यालयात करण्यासाठी विद्यापीठ सज्ज झाल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुनील भामरे यांनी "सकाळ'ला दिली. या प्रणालीने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी 15 दिवस लागतील. या पूर्वी 45 दिवसांचा कालावधी लागत होता. उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मेलवर किंवा स्वतः पाहता येऊ शकते, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रा. योगेश पाटील यांनी सांगितले.

काय आहे डीईएस
सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे राज्यातील महाविद्यालयांतील परीक्षेच्या उत्तरपत्रिका विभागीय स्कॅनिंग केंद्रावर स्कॅन करण्यात येतील. प्रत्येक उत्तरपत्रिका "मास्क' केल्या जातील, तसेच प्रश्न आणि उत्तर याची विभागणी केली जाईल. स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मर्यादित वेळेत केव्हाही तपासता येतील, तसेच त्याचे मूल्यांकनही ऑनलाइन होणार आहे.

"डीईएस' प्रणाली ही अतिशय पारदर्शक आहे. याद्वारे प्रश्नपत्रिका एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर मेल केली करण्यात येते. तसेच परीक्षा झाल्यावर प्रत्येक उत्तरपत्रिकेचे दिलेल्या वेळेतच मूल्यांकन करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे प्रत्येक पान तपासल्याची नोंद तपासणीसाला करावी लागेल. या प्रणालीद्वारे गोपनीयता राखली जाईल.
- प्रा. विलास गायकर, कुलगुरू
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे.