मच्छीमार्केटला परवानगी का मिळत नाही?

मच्छीमार्केटला परवानगी का मिळत नाही?

कणकवली - खासदार, पालकमंत्री आणि राज्यमंत्र्यांना स्वत:च्या घरात आणता, पण त्याच मंत्र्यांच्या माध्यमातून मच्छी मार्केटमध्ये चिकन विक्रेत्यांना बसविण्यासाठीची परवानगी संदेश पारकर आणू शकलेले नाहीत. त्यांना जनतेपेक्षा, वैयक्‍तिक छबी जपणे महत्त्वाचे वाटत असल्याने मच्छीमार्केटचा प्रश्‍न रखडला असल्याची टीका कॉंग्रेसचे नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी आज केली. येथील कॉंग्रेस कार्यालयात कॉंग्रेस नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन संदेश पारकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या वेळी अण्णा कोदे उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, ""पारकरांनी आमदार नीतेश राणेंवर नौटंकीचे आरोप करू नयेत. राणेंमुळेच पारकरांना अवघ्या तीन महिन्यांत लाल दिवा मिळाला होता. राणेंवर आरोप करून ते स्वत:चे राजकीय महत्त्व वाढवू पाहत आहेत.‘‘ ते म्हणाले, ""गेल्या काही महिन्यात आमदार, खासदार, पालकमंत्री, राज्यमंत्री यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून आपले राजकीय वजन वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण मच्छीमार्केटमध्ये चिकन, मटन विक्रेत्यांना बसविण्यासाठी आवश्‍यक ती तांत्रिक परवानगी ते आणू शकलेले नाहीत. यातून त्यांना शहरवासीयांचा किती कळवळा आहे हे दिसून येते.‘‘

बंडू हर्णे म्हणाले, ""मच्छी मार्केटचे गेल्यावर्षी उद्‌घाटन झाले. या उद्‌घाटन कार्यक्रमात संदेश पारकर यांनी पुढील दोन महिन्यांत शहरातील सर्व चिकन आणि मटन विक्रेत्यांना मच्छी मार्केटमध्ये बसविणार असल्याचे जाहीर केले होते. तेच पारकर आता कोलांटी उडी मारत आहेत. याखेरीज ज्यांनी लाल दिवा मिळवून दिला, त्यांच्याच खाल्ल्या घरचे वासे ते मोजत आहेत.‘‘

नियमावर बोट का?
मच्छी मार्केटमध्ये चिकन, मटन विक्रेते बसविण्याबाबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नियमावर बोट ठेवत आहेत. इमारत आणि बांधकाम परवानगी, गटारांची कामे व इतर कंत्राटे काढताना नियमांना बगल दिली जाते. काही वेळा नियम शिथिल केले जातात, तर मग मच्छी मार्केटबाबतच नियमावर बोट का ठेवता असाही प्रश्‍न बंडू हर्णे, समीर नलावडे यांनी उपस्थित केला. शहरातील मच्छी मार्केटलगतच्या मोकळ्या जागेत चिकन आणि मटन विक्रेत्यांना बसविण्याचा प्रस्ताव पारकर यांनी मांडला आहे, मात्र हा प्रकार जादा दराच्या निविदा करून पैसे उकळण्याचा प्रकार आहे. मार्केटच्या बाहेर जर चिकन विक्रेते बसवलात तर वरचा मजला आणि तेथील सुविधांवरील खर्च वाया जाणार आहे, असे श्री. हर्णे म्हणाले.

शहरवासीयांची बैठक घ्या
चिकन, मटन व्यावसायिकांना एकत्रित आणण्यासाठी आम्ही सर्व 19 नगरसेवक पाठिंबा देण्यास तयार आहोत. वाटल्यास सत्ताधाऱ्यांनी शहरवासीयांची बैठक लावून निर्णय घ्यावा. सभागृहातील ठराव आणि शहरवासीयांचा निर्णय राज्यशासनाला मान्य करावाच लागेल, असेही श्री. नलावडे म्हणाले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com