महाडमध्ये आज जनआक्रोश आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

महाड - कॉंग्रेसतर्फे जनआक्रोश आंदोलनाला सुरवात झाली असून, कोकण विभागाची जनआक्रोश सभा महाड येथे उद्या (ता.4) भिलारे मैदान येथे होत आहे. या सभेला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाड नगर परिषदेच्या शिवाजी चौकातील नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि अग्निशमन केंद्राच्या इमारतीचा उद्‌घाटन सोहळाही उद्या होत आहे.

राज्य सरकारची तीन वर्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असून, सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात इंदिरा गांधीच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात चार ठिकाणी जनआक्रोश आंदोलन केले जात आहे. पालघर ते सिंधुदुर्ग या कोकण विभागासाठी जनआक्रोशाची सभा उद्या महाड येथे होत आहे.

या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत. या जनआक्रोश सभेचे आयोजक माजी आमदार माणिक जगताप आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सहा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महाड नगरपालिकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व अग्निशमन केंद्राच्या इमारतीचा उद्‌घाटन सोहळा होणार आहे.