मालवण : महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळले दुर्मिळ 'ग्रीन सी टर्टल'

महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच देवबाग-तारकर्ली येथे 'ग्रीन सी टर्टल' या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर आली.
ग्रीन सी टर्टल
ग्रीन सी टर्टलsakal

मालवण : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच देवबाग-तारकर्ली येथे 'ग्रीन सी टर्टल' या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर आली. ही सर्व पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. काल (ता.५) सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पहिले पिल्लू घरट्याबाहेर आले. त्यानंतर दुपारपर्यंत सर्व पिल्ले घरट्या बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार व सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. दरम्यान ही घटना महाराष्ट्राच्या कासव संवर्धन मोहिमेत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे येथील स्थानिक पर्यावरण रक्षकांचे अभिनंदन करत असल्याचे कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.

देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवाने अंडी घालून घरटे बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर ११ जानेवारीला समोर आणली होती. सुरुवातीला हे घरटे ऑलिव्ह रिडले या सागरी कासव प्रजातीची असल्याचे बोलले जात होते; परंतु या कासवाचे फोटो आणि व्हिडिओ येथील पर्यावरण विषयक अभ्यासक संदीप बोडवे यांनी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. या फोटो आणि व्हिडिओमधील कासव हे 'ऑलिव्ह रिडले' या सागरी कासव प्रजाती पेक्षा काहीसे वेगळे वाटत असल्याचे कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कासव अभ्यासकांशी याबाबत चर्चा केली.

सखोल माहितीसाठी हे फोटो आणि व्हिडिओ बेंगलोर येथील वाईल्ड लाईफ कॉन्झव्हेशन सोसायटीचे कासव अभ्यासक नुपूर काळे यांनाही पाठविण्यात आले. काळे यांनी या फोटो आणि व्हिडिओंचा अभ्यास केल्यानंतर हे कासव 'ग्रीन सी टर्टल' असल्याचे स्पष्ट केले.

'ग्रीन सी टर्टल'ने अंडी घालून घरटे बनविल्यानंतर ५२ दिवसांनी 'ग्रीन सी टर्टल'च्या घरट्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. काल (ता.५) सकाळी कासवाची पिल्ले घरट्यामधून बाहेर येतील याचा घरट्याचे रक्षक मालंडकर यांना पहिल्यापासून अंदाज असल्यामुळे ते काल पहाटेपासूनच घरट्याजवळ पहारा देत होते. दुपारी ३ वाजेपर्यंत घरट्यामधून ७४ पिल्ले बाहेर आली तर ३ अंडी खराब निघाली. सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. यावेळी कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक हर्षल कर्वे, रोहित सावंत, दुर्गा ठिगळे, यांसह इसादाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कासव घरट्याचे संरक्षण केलेल्या पंकज मालंडकर यांच्या आई अनिता या सुध्दा यावेळी उपस्थित होत्या.

अंड्यांसाठी २० ते ३० वर्षांचा कालावधी

ग्रीन सी टर्टल या समुद्री कासव प्रजातीची भारतात फक्त गुजरात आणि लक्षद्वीप येते घरटी आढळून येतात. या कासवाच्या खालील कवचाच्या बाजूला ग्रीन रंगाचे फॅट असते. म्हणून याला ग्रीन सी टर्टल असे संबोधले जाते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्स बिल, लॉगर हेड आणि लेदर बॅक अशा पाच प्रजातीं आढळून येतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अंडी घालून घरटी बनवितात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून येणाऱ्या ग्रीन सी टर्टल आणि लेदर बॅक ही आकाराने मोठी असणारी कासवे आहेत. ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाला अंडी देण्यासाठी पूर्ण वाढ होण्यास २० ते ३० वर्षांचा कालावधी लागतो असे अभ्यासकांनी सांगितले.

"महाराष्ट्रात पहिल्या ग्रीन सी टर्टल घरट्याची नोंद देवबाग तारकर्लीच्या किनाऱ्यावर होणे व अंड्यातून पिल्ले बाहेर येणे ही येथील कासव संवर्धन करणाऱ्या निसर्ग मित्रांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मागील ५२ दिवस हे घरटे व त्यातील अंड्यांचे संरक्षण करणे अतिशय महत्त्वपूर्ण होते. ते काम आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. या कामी कांदळवन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले."

- संदीप बोडवे, स्थानिक पर्यावरण रक्षक

"महाराष्ट्रात आढळलेले ग्रीन सी टर्टलचे हे पहिलेच नेस्ट असल्यामुळे आम्ही याचा अभ्यास करणार आहोत. या घरट्यातील अंड्यांचे प्रमाण, त्यापैकी बाहेर आलेली पिल्लांची संख्या आणि लागलेला कालावधी या माहितीचा आम्ही पुढील काळात ग्रीन सी टर्टलचा अधिवास जतन करण्यासाठी उपयोग करणार आहोत."

- हर्षल कर्वे, कांदळवन प्रतिष्ठानचे सागरी जीव अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com