अलोट गर्दीत शिवशंभोचा जागर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरातील श्री तृणबिंदुकेश्‍वर, जंबुकेश्‍वर, किल्ला येथील भागेश्‍वर आणि राजिवडा येथील काशिविश्‍वेश्‍वर मंदिरांत महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दीमध्ये शिवशंभोचा जागर घुमला. पहाटेपासून रात्रीपर्यंत या सर्व मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. भजने, धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्री साजरी झाली.

तृणबिंदुकेश्‍वर मंदिरात पूजा, अभिषेक, आरती, दुपारी महाप्रसाद झाला. सकाळपासून विविध भजन मंडळांची भजने झाली. सुमारे दोन हजार भाविकांनी तृणबिंदुकेश्‍वर व जंबुकेश्‍वराचे दर्शन घेतले. भाट्ये येथील श्री लक्ष्मीकांत रवळनाथ भजन मंडळ, लक्ष्मी प्रासादिक मंडळ, श्री लिंगेश्‍वर मंडळ, कोतवडेतील जय हनुमान मंडळ, मुरुगवाड्यातील जय भैरव भजन मंडळ आणि घुडेवठारातील दत्तप्रासादिक मंडळ आदींची दिवसभर भजने झाली. दुपारी महाशिवरात्री उत्सव कथेवर कीर्तनकार किरण जोशी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर मुग्धा घुडे-शिवलकर यांचा भक्तिगीत कार्यक्रम रंगला. रात्री भोवत्यांच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली.

किल्ला येथील भागेश्‍वर मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त भजनांचा कार्यक्रम रंगला. पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. शिवभक्त दानशूर भागोजीशेठ कीर यांनी मेहनत, सचोटीने मिळवलेली धनदौलत जनतेच्या सुखसोयींसाठी दानधर्मात मुक्तहस्ते खर्च केली. त्यांनी किल्ला येथील निवासस्थानाजवळ श्री भागेश्‍वर नावाची शंकराची पिंडी व मूर्ती सन १९२२ मध्ये प्रतिष्ठापित केली. वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम नमुना म्हणून हे मंदिर कोकणात प्रसिद्ध आहे. महाशिवरात्र व भागोजीशेठ कीर यांची पुण्यतिथी आज एकाच दिवशी आली. यामुळे मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांसह अन्य विविध कार्यक्रम भागेश्‍वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केले होते. किल्ला येथील सांब मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराच्या दोन पिंड्या जवळजवळ असून या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Web Title: mahashivratri in ratnagiri