माजगाव हद्दीत तरुणांचे "पाणी अडवा, पाणी जिरवा' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

15 वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेना आमदार देवेंद्र साटम यांनी आमदार निधीतून माजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चार गावांसाठी पाणी योजना राबवली. ही जलवाहिनी कमी व्यासाची आहे. जीर्णही झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. 
- राजेश पाटील, उपसरपंच, माजगाव. 

खोपोली - उन्हाची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी माजगाव ग्रामपंचायत हद्दीतील वारद, माजगाव व आंबिवली या गावातील तरुण एकत्र आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी "पाणी अडवा, पाणी जिरवा' संकल्पनेनुसार पाताळगंगा नदीचे पाणी जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्याची विहीर असलेल्या शेतामध्ये सोडले जाणार आहे. 

हे पाणी पाझरून विहिरीची पाणीपातळी वाढल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा आशावाद माजगावचे उपसरपंच राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. या सामाजिक कार्यात माजगाव, आंबिवली व वारद गावातील तरुणांचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. पाताळगंगा नदी ते वारदमधील विहीर अशा अर्धा किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. 

माजगाव-आंबिवली या गावांना वारद गावातील विहिरीतून पाणीपुरवठा होत आहे. पाताळगंगा नदीपात्रातून टाकलेली जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी या तीनही गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. येत्या काही दिवसांत ही समस्या तीव्र होणार आहे, हे लक्षात घेऊन वारद, माजगाव, आंबिवली या गावातील तरुणांनी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम एकीच्या भावनेने हाती घेतले आहे. त्यास उपसरपंच राजेश पाटील यांची साथ लाभली आहे. या जलवाहिनीचे पाणी विहिरीजवळच्या तलावात सोडले जाणार आहे. जमिनीत मुरलेल्या पाण्याने विहिरीचा साठा वाढून पाणीटंचाईवर मात करता येईल, असा गावकऱ्यांना विश्‍वास आहे. 

ही नवी वाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. मार्च ते पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, अशी आशा आहे. या विहिरीला मोठे झरे आहेत. जमिनीत झिरपलेले पाणी विहिरीत मुबलकपणे जमा होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. "पाणी अडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यास सरकार उदासीन असले, तरी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. या कामी अनंता लभडे, शिवाजी शिंदे, बबन शिंदे, मंगेश लभडे, निवास शिंदे, यशवंत शिंदे, राजेश लभडे आदी ग्रामस्थांनी झोकून दिले आहे. यातून वारद, माजगाव, बुध्द्वाडा, आंबिवली या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. 

15 वर्षांपूर्वी तत्कालीन शिवसेना आमदार देवेंद्र साटम यांनी आमदार निधीतून माजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चार गावांसाठी पाणी योजना राबवली. ही जलवाहिनी कमी व्यासाची आहे. जीर्णही झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. 
- राजेश पाटील, उपसरपंच, माजगाव.