माकडताप रुग्णांच्या संख्येत वाढच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू - नव्याने ५ रुग्णांची नोंद, परप्रांतीय कामगारांची मुले

बांदा - माकडताप रुग्णांच्या संख्येत आज येथे आणखी पाच रुग्णांची भर पडली. यामुळे माकडताप रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे.

नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू - नव्याने ५ रुग्णांची नोंद, परप्रांतीय कामगारांची मुले

बांदा - माकडताप रुग्णांच्या संख्येत आज येथे आणखी पाच रुग्णांची भर पडली. यामुळे माकडताप रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे.

प्रशासनाकडून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होऊनही रुग्ण वाढण्याचे प्रमाण कायम आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी माकडतापाचा प्रवेश झाला. पहिल्यावर्षी तो दोडामार्ग तालुक्‍यापुरता मर्यादित होता. गेल्या महिन्याच्या डिसेंबरमध्ये येथे सगळ्यात आधी माकडतापाचा रुग्ण आढळला. यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. विशेषतः सटमटवाडी भागात सर्वाधिक माकडतापाचे रुग्ण सापडले. आरोग्य विभाग साथीच्या नियंत्रणासाठी एकाकी झुंज देत होता, मात्र दुसरीकडे माकड मृत्यूचे सत्र सुरूच होते. यामुळे वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. नुकत्याच येथे आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना स्थानिकांनी याबाबत जाब विचारला. यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. कालपासून पशुसंवर्धन आणि वन विभागाची जिल्ह्याभरातील कुमक येथे दाखल झाली. त्यांनी उपाययोजना सुरू केली असली तरी रुग्ण सापडण्याचे प्रमाण कायम आहे.

येथे आतापर्यंत तापाच्या १०३ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. यात नव्याने आढळलेल्या पाच रुग्णांसह एकूण माकडताप पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ वर पोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण येथे बीएसएनएलच्या केबल टाकण्यासाठी आलेल्या कामगारांच्या कुटुंबामधील आहेत. हे सर्व रुग्ण सहा ते चौदा वयोगटातील आहेत. ते सटमटवाडीत उघड्यावर झोपडी बांधून राहत होते. तापाची लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असता ते माकडताप पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. येथील आरोग्य केंद्रात सध्या काही तापाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर स्थितीतील चौघांवर बांबुळी (गोवा) येथे उपचार केले जात आहेत.

दुसरीकडे वनविभागाकडून परिसरातील जंगलमय भागात पाहणी सुरू आहे. मृत माकड आढळल्यास तेथे पावडर टाकून माकड जाळली जात आहेत. आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग येथे गुरांच्या गोठ्यामध्ये जंतुनाशकांची फवारणी करत आहेत. पुढच्या टप्प्यात आजूबाजूच्या गावांमधील गोठ्यांमध्ये ही फवारणी केली जाईल.

परिसरात जनजागृती
बांदा परिसरातील इन्सुली, शेर्ले, डेगवे, गाळेल या गावांमध्ये माकडतापाविषयी जनजागृती केली जात आहे. स्लाईट शोच्या माध्यमातून माकडताप होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शन केले जात आहे. पुढच्या टप्प्यात या गावांमध्ये गोठ्यांमध्ये फवारणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सक्रिय यंत्रणा
वन विभाग कर्मचारी..................................२५
पशुसंवर्धन कर्मचारी..................................२५
पशुसंवर्धनची पथके....................................५
आरोग्यसेवक..........................................३
आरोग्यसेविका.........................................३
रिपोर्टिंगसाठी कर्मचारी..................................१
आरोग्य सुपरवायझर.....................................१
वैद्यकीय अधिकारी......................................५
फिजिशियन.............................................१
हिवताप निर्मूलन पथक..................................१

नव्याने पाच रुग्ण आढळले असले तरी आता सर्व बाजूंनी साथ नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. फवारणी केली जात आहे. वन विभागही सक्रिय झाला आहे. यामुळे स्थिती लवकरच आटोक्‍यात येईल.
- डॉ. जगदीश पाटील, आरोग्य केंद्र, बांदा

बांद्यात काल आमचे ५४ कर्मचारी कार्यरत होते. आज ही संख्या २५ आहे. उद्या आणखी कर्मचारी येणार आहेत. ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पाहणी करत आहोत. आतापर्यंत केवळ २ मृत माकडे मिळाली आहेत.
- विजय कदम, वनक्षेत्रपाल

 

Web Title: makadtap patient increase