कर्जतमधील कुपोषित मुले उपचारांविना

malnutrition - children without treatment
malnutrition - children without treatment

नेरळ - कर्जत तालुक्‍यात सध्या दीडशेहून अधिक कुपोषित आणि ४५ अतिकुपोषित बालके आहेत. कुपोषणाच्या गर्तेतून आदिवासी बालकांना बाहेर काढण्यासाठी सरकार, मंत्री, प्रशासन पराकाष्ठेने झगडत असल्याचा देखावा निर्माण केला जात असताना प्रशासनाने जाहीर केलेले कशेळे येथील बाल उपचार केंद्र दीड महिना उलटूृनही सुरू झालेले नाही. कर्जत येथे नोव्हेंबरमध्ये सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रातही जेमतेम केवळ पाच कुपोषित बालके ठेवली आहेत. 

प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे कर्जत तालुक्‍यात कुपोषण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्‍यता आहे. आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांच्यात समन्वय नसल्याने कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नाही. 

कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेने खास निधीची तरतूद केली. त्याच वेळी राज्य सरकारच्या वतीने पालकमंत्री प्रकाश महेता यांनीही सरकारचा निधी दिला. त्यातून तालुक्‍यातील कुपोषण कमी होईल, अशी अपेक्षा होती. प्रारंभी अंगणवाडीमध्ये अशा बालकांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. तरीही कुपोषण कमी होत नसल्याने कहसेले येथील ग्रामीण रुग्णालय आणि कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र उघडून तेथे अतिकुपोषित ४५ बालकांना दाखल करण्याचा निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीला घेण्यात आला होता. तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला होता. या केंद्रांत अतिकुपोषित बालकांवर उपचार करताना त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्याचे उद्दिष्ट होते. त्याच वेळी या बालकांच्या पालकांची राहण्याची आणि भोजनाची सोयही सरकारतर्फे करण्याचे ठरले होते.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रात अतिकुपोषित १२ बालकांना दाखल केले होते. त्यातील सहा बालकांचे वजन वाढल्याने त्यांना सोडण्यात आले. पाच कुपोषित बालके आजही तेथे आहेत. ही १२ बालके सोडली तर अतिकुपोषित ३३ बालके बाल उपचार केंद्रात का दाखल झाली नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

दुसरीकडे कर्जत उपजिल्हा रुग्णालय गावापासून लांब असेल तर कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू करण्याचे नियोजन होते. तेथे अतिकुपोषित बालकांसाठी एक वेगळा कक्ष तयार करण्यात आला होता. गेल्या दीड महिन्यात हे केंद्र बालकांअभावी सुरू होऊ शकले नाही. याचा अर्थ अतिकुपोषित बालके या केंद्रात पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी यंत्रणांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. त्यामुळे अतिकुपोषित बालके गाव-वाडीतून निघून कशेळे किंवा कर्जत यापैकी एकाही बाल उपचार केंद्रात पोहोचली नाहीत. अशी ३३ बालके बाल उपचार केंद्रात पोहोचली नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न आणखी जटिल बनला आहे. याचे कोणतेही सोयरसुतक ना अंगणवाड्यांची जबाबदारी असलेल्या महिला बालविकास विभागाला आहे, ना आरोग्य विभागाला. 

कर्जत पंचायत समितीमध्ये ४ नोव्हेंबर रोजी बाल उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या ग्रामीण रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी खास खोली तयार करून ठेवण्यात आली. किमान १० कुपोषित बालके आली असती तरी हे बाल उपचार केंद्र सुरू झाले असते. आमची त्यासाठी आजही तयारी आहे. कुपोषित बालके दाखल झाल्यास हे केंद्र कार्यान्वित केले जाईल.
- डॉ. बाळकृष्ण हंकारे,  अधीक्षक, कशेळे ग्रामीण रुग्णालय            

आमच्या आदिवासी समाजाकडे सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष नाही, हे या प्रकरणावरून दिसून येते. दुसरीकडे, कुपोषित बालके आणि त्यांचे पालक हे बाल उपचार केंद्रात जात नसतील तर त्यांना तेथे बळजबरीने नेले पाहिजे.
- वामन ठोंबरे, ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com