मालवणात संरक्षक कठडा वाहून गेला

मालवणात संरक्षक कठडा वाहून गेला

मालवण - तालुक्‍यात मेघगर्जनेसह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कुंभारमाठ-देऊळवाडा जरीमरी मुख्य उताराच्या रस्त्यावरील घळणीचा पंधरा मीटरचा संरक्षक कठडा कोसळून सुमारे ४० ते ५० फूट वाहून गेला. ही घटना आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती.

मुसळधार पावसामुळे शहरातील देऊळवाडा, आडवण, रेवतळे भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. देऊळवाडा येथील मोरीचे तोंडबंद केलेल्या स्थितीत असल्याने दशरथ कवटकर यांच्या घराला पावसाच्या पाण्याने चहु बाजूने वेढा दिला होता. तालुक्‍यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. 

शनिवारी (ता. १७) रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यात तालुक्‍यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान शहराच्या सीमेवरील कुंभारमाठ व देऊळवाडा जरीमरी उतार या हद्दीतील संरक्षक कठडा कोसळली.

पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे या उतारावरील घळण कोसळून संरक्षक कठड्याचे चिरे तसेच या ठिकाणची झाडे सुमारे ४० ते ५० फूट वाहून गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खैदा आडारी रस्त्यालगतची घळणही कोसळली होती. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार सुहास खडपकर, तलाठी डी. एस. तेली, मंगेश तपकीरकर, अरुण वनमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचारी संतोष गलोले, हरिश्‍चंद्र जायभाय, एस. टी. पवार, एस. एस. ठाकूर, स्वाती जाधव, सिद्धेश जायभाय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीन दाणे, किरण शिंदे, सुभाष चौकेकर, नंदू साळकर,  श्री. देवरे यांनी या भेट देत पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी दुर्घटना भागात मातीने भरलेले बॅरल ठेवून एकेरी वाहतुकीस मार्ग मोकळा केला.

देऊळवाडा याठिकाणी कोसळलेल्या संरक्षक कठड्यामुळे याठिकाणी डोंगुर्ला तलावाच्या येथून आलेला नळपाणी योजनेचा प्लास्टिक पाइप तुटून गेला होता. ही नळपाणी योजना सध्या बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील देऊळवाडा रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने एसटी, तसेच दुचाकी वाहन चालकांना कसरत करत वाहने या पाण्यातून चालवावी लागत होती. शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. देऊळवाडा येथील दशरथ कवटकर यांच्या घरा शेजारी असलेल्या मोरीच्या ठिकाणी कर्व्हिगचे काम करण्यात आले होते. यावेळी मोरीचे तोंड पूर्ण बंद केल्यामुळे घराच्या चारीही बाजूला पाणी भरले होते. गेल्या आठ वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याची ही पहिलीच घटना असल्याचे श्री. कवटकर यांनी सांगितले.

मोटार अडकली
रेवतळे येथील हळदणकर घर ते मांजरेकर घर या भागात असणाऱ्या व्हाळीच्या सफाईचे काम न केल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणच्या नागरिकांनी या व्हाळीची सफाई होण्यासाठी पालिकेला निवेदन सादर केले होते, मात्र पावसाला सुरवात झाली असतानाच या ओहाळाची सफाई करण्यात आल्याने या ठिकाणी पाणी साचल्याचे नागरिकांनी सांगितले. बस स्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवासी व नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. आडवण देऊळवाडा स्मशान भूमी या मार्गावर व देऊळवाडा रामेश्वर मंदिर परिसरातील भागात ओहाळाच्या पाण्यात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com