सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार

सी-वर्ल्ड प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार

मालवण - पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाकांक्षी असलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातच साकारला जाईल. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी निश्‍चिंत रहावे. सी-वर्ल्ड प्रकल्पाचे स्वप्न भाजप सरकारच्या माध्यमातून साकारले जाईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तालुका भाजप कार्यालयात आज कार्यकारिणीची बैठक झाली. तालुका भाजपतर्फे अटल बंधन सप्ताह करण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत झाला. सर्व बूथवर १५ पर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या वेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा चिटणीस भाऊ सामंत, धोंडू चिंदरकर, विजय केनवडेकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, आप्पा लुडबे, गणेश कुशे, दादा वाघ, उल्हास तांडेल यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले, ‘‘सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प साकारला जावा यासाठी सध्या मुख्यमंत्र्याशी चर्चा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प सिंधुदुर्गातच साकारला जाईल. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी या प्रकल्पाची चिंता करू नये. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प भाजप सरकारच्या माध्यमातूनच साकारला जाईल.’’

कोळंब पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात निविदा, कंत्राटदार तसेच अन्य समस्येसंदर्भात चर्चा करण्यात आली. यात संबंधित अधिकारी मुंबईत निविदा प्रक्रियेसाठी गेले असून दुरुस्तीच्या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. या पुलावरून वाहतुकीसाठी जे नियम घालण्यात आले आहेत त्यात शिथिलता यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेतली जाणार आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आवश्‍यक पाठपुरावा सुरू असून हे काम लवकरच पूर्ण करून जनतेची गैरसोय दूर केली जाईल, असे स्पष्ट केले. पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे.  मच्छीमारांच्या समस्येसंदर्भात भाजपची भूमिका एकच आहे. मासेमारी अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी. त्यांचे अधिकार हिरावून घेता कामा नये. जसे पर्ससीनच्या मासेमारीला क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे तसेच मिनी पर्ससीनच्या मासेमारीसाठीही क्षेत्र निश्‍चित करायला हवे. भविष्यात मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेत याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. आम्हाला कलह वाढवायचा नाही तर तो दूर करायचा आहे. पर्ससीनच्या मासेमारीसंदर्भात भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात श्री. जठार म्हणाले, ‘‘मच्छीमारांच्या समस्येसंदर्भात भाजप सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तोरसकर यांच्या मताशी आपण सहमत नाही. त्यांना पक्षाच्यावतीने योग्य ती समज देण्यात आली आहे. त्यांना सरकारचा उपयोग करून घेत प्रश्‍न सोडविता येत नसतील तर त्यांनी पदाचा त्याग करून बाहेर पडावे.

पारंपरिक, मिनी व पर्ससीनधारक हे तिन्ही मच्छीमार स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांनी आपसांत न भांडता एकत्र यावे. या तिन्ही प्रकारच्या मच्छीमारांनी एकत्रित येत परप्रांतीय ट्रॉलर्सधारकाविरूद्ध लढा देऊया. आपली ताकद वाढवूया. तरच हा वाद सुटू शकतो. या सर्वांचा विचार करून या तिन्ही प्रकारच्या मच्छीमारांनी एकत्रित यावे. या तिन्ही प्रकारच्या मच्छीमारांना एकत्रित घेत ज्या समस्या आहेत त्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन सोडविण्यात येईल.’’ येथील तहसीलदार पद गेले आठ महिने रिक्त आहे. यासंदर्भात विचारले असता यावरील कार्यवाही येत्या काही दिवसात होईल असे श्री. जठार यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास हा भाजपच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे जनतेने विकासाची चिंता करू नये. येत्या काळात जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार हे भाजपचेच असतील असा विश्‍वासही श्री. जठार यांनी व्यक्त केले. 
येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची भेट घेत समस्या मांडली. या समस्येसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून ही समस्या सोडविण्यात येईल असे श्री. जठार यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमच्याशी वरिष्ठांच्या चर्चेशिवाय  राणेंचा प्रवेश नाही
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यासंदर्भात बोलताना श्री. जठार म्हणाले, ‘‘राणे यांना पक्षात घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे; मात्र अद्यापपर्यंत अशी चर्चा आपल्याशी झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा जेव्हा होईल त्यावेळी पुढील निर्णय जाहीर केला जाईल. तोपर्यंत राणेंचा प्रवेश होणार नाही.’’

कोकणातील गावठाण घराच्या परवानग्या या तहसील तसेच जिल्हा पातळीवर दिल्या जातात. या परवानग्या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी कोकण विभागाची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक होईल. या बैठकीत योग्य तोडगा निघेल. या प्रश्‍नासंदर्भात ग्रामविकास मंत्री, नगरविकास राज्यमंत्री यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे कोकणावर प्रेम आहे. त्यामुळे गावठाण घराच्या परवानग्यांचा विषय ते निश्‍चितच सोडवतील. 
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com