मच्छीमारांवरील अन्यायास राणे जबाबदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मालवण - काँग्रेसमध्ये अस्तित्व संपल्याने भाजपच्या वाटेवर असलेल्या राणे पिता-पुत्रांना आपले पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांचा पुळका आला आहे. पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आमदार नीतेश राणे यांनी सांगून मच्छीमारांवर अन्याय झाला हे मान्य केले आहे. याला नारायण राणे हेच जबाबदार आहेत. यामुळे राणे पिता-पुत्र पारंपरिक मच्छीमारांची माफी मागणार का असा प्रश्‍न आमदार वैभव नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

येथील पालिकेच्या नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद झाली. या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, सेजल परब, तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, किरण वाळके, प्रवीण रेवंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. नाईक म्हणाले, ‘‘काँग्रेसने काही दिवसापूर्वी जे आंदोलन छेडले. त्यात एकही स्थानिक पारंपरिक मच्छीमार सहभागी झाला नव्हता. शिवसेना ही कायमस्वरूपी मच्छीमारांच्या लढ्यात त्यांच्या सोबत राहिलेली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घेऊन आमदार राणेंना आंदोलन करावे लागले होते. त्यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने अधिकाऱ्यांवर त्यांनी राग काढला होता. मच्छीमारांना आता न्याय देण्याची भाषा ते करत आहेत. यापूर्वी जे पर्ससीनधारक आहेत ते काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पर्ससीनला पाठिंबा देताना पारंपरिक मच्छीमारांची आठवण त्यांना झाली नव्हती का? पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनाच्यावेळी नारायण राणे यांनी मच्छीमारांची औकाद काढली. हे पारंपरिक मच्छीमार आपले काय करणार असे सांगत या मच्छीमारांनी आधुनिकतेची कास धरावी असेही सांगितले. आता मच्छीमारांच्या मतांवर डोळा ठेवत पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी आपण असल्याचे राणे पिता-पुत्र भासवीत आहेत; मात्र मच्छीमार काँग्रेसचे षड्‌यंत्र ओळखून आहेत. यापूर्वी आणि यापुढेही काँग्रेस कधीच पारंपरिक मच्छीमारांना साथ करणार नाहीत. कारण पारंपरिक मच्छीमार आणि शिवसेना यांचे नाते अतूट आहे. आपले प्रश्‍न कोण सोडवू शकते हे मच्छीमारांना माहीत आहे. ’’

भाडोत्री सफारीवाल्यांवर कारवाईसाठी आक्रमक
आमदार राणे यांची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू होती. नीतेश राणे यांच्यासोबत असलेल्या भाडोत्री सफारीवाल्यांवरही कारवाई करण्यासाठी शिवसेना आक्रमक राहणार आहे. शिवसेनेकडून वारंवार टीका झाल्यानेच नीतेश राणे यांनी स्वतः अटक करून घेतली, असेही त्यांनी सांगितले.