मांडकीत लोकसहभागातून तळी मोकळी करणार

प्रकाश पाटील
बुधवार, 3 मे 2017

१९९८ पासून साठा - तळ्याचा बांध २५ फूट रुंद व २० फूट खोल करणार

सावर्डे - चिपळूण तालुक्‍यातील मांडकी खुर्द येथील गड माणिकदुर्गाच्या पायथ्याशी १९९८ ला बांधण्यात आलेल्या तळ्यातील गाळ उपसा व रुंदीकरणाच्या कामाला ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरवात झाली आहे. येथील तळ्याचे रुंदीकरणही केले जाणार आहे. गावात गाळाने भरलेली तीन तळी रिकामी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

गावचे पहिले सरपंच विठ्ठल मादगे व उपसरपंच धोंडू धुमक यांच्या प्रयत्नाने तीन तळी बांधण्यात आली. काळाच्या ओघात ती गाळाने भरली. माजी मुख्याध्यापक सदाशिव बापट यांच्या पुढाकाराने गावाने तळ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. बापट यांनी स्वतः ५ हजार रुपये दिले. त्यानंतर लोकवर्गणी काढण्यात येणार आहे. काल (ता. १) गावकर शंकर डिके यांच्या हस्ते गाळ उपशाला सुरवात झाली. पहिल्या दिवशी जेसीबीच्या साह्याने तळ्यात १९ वर्षे साचलेला गाळ मुख्य बांधावर आणला जात आहे. सुमारे शंभर मीटर लांब, पंधरा फूट रुंद आणि सध्या दहा फूट खोल असलेल्या तळ्याचा बांध आता २५ फूट रुंद व २० फूट खोल करण्यात येणार आहे.
 
बांधावर पाण्याचा दाब पडू नये म्हणून बांधाकडून डोंगराच्या पायथ्याच्या दिशेने खोली करण्यात येणार आहे. तळ्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सांडव्याचे कामदेखील करण्यात येणार आहे.

याप्रसंगी सरपंच संतोष गुढेकर, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव बापट, शांताराम खांबे, पोलिसपाटील संजय धुमक, उपसरपंच संजय मादगे, कृष्णा मादगे, सोनू मादगे, शांताराम डिके, रामचंद्र धुमक, सीताराम धुमक, बाळा गुढेकर, कृष्णा विठू मादगे आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

गावच्या विकासासाठी पाणी हा महत्त्वाचा प्रश्‍न असून, केवळ पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त शेती व अन्य कामासाठी जलसंवर्धन करणे काळाची गरज असून गावातील तीन शेततळ्यांपैकी एका तळ्यातील गाळ उपशाला सुरवात केली आहे. मात्र, गावाचे आर्थिक बळ कमी पडणार आहे. त्यासाठी शासनाने आमच्या कार्याला बळ द्यावे. 
- संतोष गुढेकर (सरपंच-मांडकी खुर्द)