कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत आदिवासींना चौदाशे दाखल्यांचे वितरण

Adivasi
Adivasi

पाली : महाराष्ट्र शासन महसूल विभाग, तहसिल कार्यालय सुधागड आयोजित कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे दाखले वितरण शिबिर मंगळवारी (ता.12) झाले. आत्मोन्नत्ती विद्यामंदीर, जांभुळपाडा येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी चौदाशे दाखले, शिधापत्रिका व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थर उंचावण्याच्या दृष्टीने विविधांगी लोकाभिमुख व जनकल्याणकारी शासन योजना तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची प्रक्रीया कातकरी उत्थान अभियाना अंतर्गत सुरु आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह व रोजंदारीसाठी आदिवासी बांधवांचे होत असलेले स्थलांतर रोखण्याकरिता भविष्यात शासन योजनेअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार असून स्थानिक रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार आहे असे उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले (रोहा) यांनी सांगितले.

या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी, कातकरी समाजघटकाचा सर्वांगिण विकास व उत्कर्ष साधण्याच्या हेतूने महाराजस्व अभियान, विस्तारीत समाधान योजना, कृषीविषयक योजना मार्गदर्शन, पुरवठा विषयक कामे, संगणकीकृत सातबारा वाटप, ग्रामविकास विभागासबंधी योजनेचे मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप, निवडणुक विषयक कामे, ग्राम परिवर्तन अभियान, संजय गांधी निराधार योजना सबंधी माहिती देण्यात आली. अंत्योदय कार्ड, उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, रहिवाशी दाखले, आधार नोंदणी व विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप व मार्गदर्शन करण्यात आले.
 
अशा स्वरुपाचे शिबीर गुरुवारी (ता. 7) येथील भक्तनिवास क्र. 1 पाली येथे पार पडले. तसेच शुक्रवारी (ता. 8) श्रीसंत नामदेव माध्य. विद्यालय नांदगाव येथे देखील कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत आदिवासी बांधवांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार निंबाळकर यांनी सांगितले की सुधागड तालुक्यात एकूण 60 हजार लोकसंख्या असून यापैकी 25 हजार आदिवासी लोकसंख्या आहे. आदिवासीबांधवांना लोकप्रवाहात आणण्यासाठी शासन व प्रशासन काम करीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार स्वयंसेवक बनून काम करण्याच्या भूमिकेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती साक्षी दिघे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आदिवासीबांधवांना शासन योजनांचा लाभ मिळण्याकरीता विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते. शासन आपल्या दारी या अभिनव संकल्पनेतून आदिवासी बांधवांना सर्व प्रकारचे दाखले देण्याकरीता प्रशासनाने राबविलेले कातकरी उत्थान अभियान अत्यंत महत्वपुर्ण व लोकपयुक्त ठरत आहे. उपसभापती उज्वला देसाई यांनी सांगितले की आदिवासी समाजबांधवांना शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्द करुन देवून त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यास शासन कटिबध्द आहे. आदिवासी बांधवांनी स्थलांतर रोखणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षण देवून प्रगती साधली पाहिजे. महिला बचतगटाच्या माध्यमातून सक्षम होतात ही बाब समाधानकारक आहे.  

यावेळी शासन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्याकरीता स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रांताधिकारी रविंद्र बोंबले, पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर, अनुलोम लोकराज्य अभियानाचे जिल्हा प्रतिनिधी रविंद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे, कळंब वनपरिमंडळ अधिकारी बापू गडदे, पाली सुधागड पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पं. स. उपसभापती उज्वला देसाई, पं. स. सदस्य सविता हंबीर, परळी सरपंच गुलाब पवार, नायब तहसिलदार वसंत सांगळे, नायब तहसिलदार वैशाली काकडे, परिणिता पाल, मंडळ अधिकारी तिवरेकर, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानाचे ग्रामपरिवर्तक विनोद ठकळे, रणजीत कांबळे, स्वप्निल बागूल, रमेश पवार, रविंद्र पवार, राकेश सावंत, आदिंसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, महसूल कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी केले, सूत्रसंचालन राकेश सावंत यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार वसंत सांगळे यांनी मानले.

मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन अभियानाअंतर्गत सुधागड तालुक्यातील सहा गावांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार केला जात असून त्याद्वारे विकास साधला जाणार आहे. आदिवासी समाजातील युवा शिक्षण घेवून प्रगती साधतोय ही बाब निच्छीतपणे कौतुकास्पद आहे. सुशिक्षीत युवा वर्गाने पुढे येवून समाजात लोकशिक्षणाच्या चळवळीबरोबरच व्यसनमुक्तीकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदिवासी बांधवांनी केलेल्या स्थलांतरामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे स्थलांतर थांबविण्यासाठी आदिवासी बांधवांनी शासन योजनेअंतर्गत उपलब्ध रोजंदारीचा वापर करावा तसेच मालकीची शेती करण्यावर भर द्यावा. दोन हजार पेक्षा अधिक दळीधारकांना प्लॉट वाटप करण्यात आले आहेत. पशुपालन, कुकुटपालन, शेततळी, दुग्धव्यवसाय आदींसारखे स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेवून प्रगती साधावी असे आवाहन प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांनी केले. 

सुधागड तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारी फळबाग लागवड, सुष्मसिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, शेतीसाठी पुरक यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन अभियान, सामुहिक शेततळे योजना, दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, हवामान आधारीत पिक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोकडे केले. हवामान आधारीत पिक योजनेअंतर्गत यावर्षी 93 लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच लाभार्थी शेतकर्‍याच्या खात्यात जमा होतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी दिली. 

वनमंडळ अधिकारी बापू गडदे यांनी वनविभाग अंतर्गत येणार्‍या शासनयोजनांची माहिती देताना सांगितले की वनविभाग समितीची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे वनपरिक्षेत्रात विविध योजना राबविल्या जातात. रोजगार निर्माण करणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारकांना कामास प्राधान्य देणे, एल. पी. जी. गॅस योजनेअंतर्गत गॅसचे वाटप करणे आदी योजनांची माहिती देण्यात आली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी मृत झाल्यास वनविभागाकडून आठ लाखाची मदत दिली जाते. गिधाडे पर्यावरणरक्षक असून गिधाड दाखविणार्‍याला एक हजार रुपयांचे वैयक्तीकरीत्या पारितोषिक गडदे यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com