कर्जमाफीच्या श्रेयावरून काँग्रेसने सेनेला फटकारले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

शेतकऱ्यांचे आंदोलनही झाले. त्याला सेनेनेही पाठिंबा दिला. या साऱ्या नंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घोषित केली; मात्र त्याचे निकष अद्याप निश्‍चित झालेले नाहीत. तरीही शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आमदार राजन साळवी यांनी तालुक्‍यात 'शिवसेनेच्या दणक्‍यामुळे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी', अशा आशयाची होर्डिंग्ज लावली.

राजापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेणारे होर्डिग्ज शिवसेनेने तालुक्‍यात ठिकठिकाणी लावले. त्यावर शिवसेनेने कर्जमाफीचे फुकटचे श्रेय लाटू नये, असा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला. तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला फटकारण्यात आले. कर्जमाफीचे निकषही सेनेला अद्याप माहिती नाहीत, असा टोला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय घेण्यावरून तालुक्‍यातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले शिवसेना आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष छेडला जाण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, म्हणून राज्यभर काढलेल्या संघर्ष यात्रेतून शेतकऱ्यांमध्ये जागृती होवून शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यातूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असा दावा आमदार हुस्नबानू खलिफे यांनी तालुका काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केला. 

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक मनोहर सप्रे यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. विविध संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न न आल्याने शेतीसाठी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडणे शेतकऱ्यांना अशक्‍य होते. त्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. हे टाळण्यासाठी शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात विरोधकांसह शिवसेनाही होती. काँग्रेस आघाडीने त्यासाठी राज्यभर संघर्ष यात्राही काढली.

शेतकऱ्यांचे आंदोलनही झाले. त्याला सेनेनेही पाठिंबा दिला. या साऱ्या नंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घोषित केली; मात्र त्याचे निकष अद्याप निश्‍चित झालेले नाहीत. तरीही शिवसेनेने कर्जमाफीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. आमदार राजन साळवी यांनी तालुक्‍यात 'शिवसेनेच्या दणक्‍यामुळे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी', अशा आशयाची होर्डिंग्ज लावली. त्याचा काँग्रेस कार्यकारिणीने समाचार घेतला. काँग्रेस आघाडीच्या संघर्ष यात्रेतून शेतकरी जागृत झाला. त्याने आंदोलन केले व कर्जमाफी झाली, असा दावा काँग्रेसने केला.