नारायण राणे म्हणजे 'चायना माल'; काहीही गॅरंटी नाही : विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. परंतु कुठल्या ज्योतिषाने मुहूर्त सांगितला हेच माहीत नाही. नवरा मुंडावळ्या बांधून थकला आहे; परंतु अद्याप प्रवेश होत नाही, असा प्रकार आहे. ज्या लोकांचा राणेंनी उद्धार केला, एकमेकांच्या झिंज्या ओढल्या, तेच लोक एकमेकांशी कसे नांदत नांदावे, याबाबत मोर्चेबांधणी करत आहेत, हे दुर्दैव आहे.

सावंतवाडी : 'भाजपाला गि-हाईक पाहिजे. त्यांना दुर्बुद्धी सुचली आहे. त्यामुळे ते नारायण राणे यांना आपल्या पक्षात प्रवेश देत आहेत. राणे 'चायना  माल' आहेत. त्यांची काही गॅरंटी नाही. त्यामुळे ते टिकतील, असे वाटत नाही', अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली

'नारायण राणे यांना भाजपात घेण्यास आमचा कोणताही विरोध नाही; परंतु जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावे, यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्न करणार आहेत', असे खासदार राऊत यांनी आज येथे सांगितले

जिल्ह्यात असलेल्या राऊत यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी जान्हवी सावंत, संजय पडते ,मायकेल डिसोझा शब्बीर मणीयार आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ''राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. परंतु कुठल्या ज्योतिषाने मुहूर्त सांगितला हेच माहीत नाही. नवरा मुंडावळ्या बांधून थकला आहे; परंतु अद्याप प्रवेश होत नाही, असा प्रकार आहे. ज्या लोकांचा राणेंनी उद्धार केला, एकमेकांच्या झिंज्या ओढल्या, तेच लोक एकमेकांशी कसे नांदत नांदावे, याबाबत मोर्चेबांधणी करत आहेत, हे दुर्दैव आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही; परंतु शिवसेनेचा पालकमंत्री कायम ठेवावा, अशी आमची मागणी असणार आहे. घर तोडायची बुद्धी भाजपला सुचली आहे त्याला आम्ही काय करणार?''

ते पुढे म्हणाले, 'भविष्यात राणे जरी भाजपात आले तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना घेऊन संसार तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे या किळसवाण्या प्रकाराबाबत अधिक बोलावे असे वाटत नाही. स्वकर्तृत्वाने मोठ्या झालेल्या नेत्याला या ठिकाणी प्रवेश दिला असता तर योग्य झाले असते. परंतु चालत्या गाडीत शिरणाऱ्या व्यक्तीला प्रवेश देऊन भाजपाने निव्वळ गि-हाईक शोधले आहे. राणे हा 'चायना माल' आहे. त्यामुळे तो टिकेल असे वाटत  नाही.''

खासगी बससंदर्भात शिवसेनेने पुकारलेले आंदोलन योग्यच आहे, अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली. 'बस चालकांची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. प्रवाशांना वाटेतच उतरविण्याचा प्रकार होत असेल, तर ते चुकीचे आहे. त्याबाबत शिवसेना आक्रमक भूमिकाच घे ईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचीही आमची तयारी आहे', असे राऊत यांनी सांगितले.