भारत-पाक मॅच, धबधबे प्रवाहित न झाल्याचे आंबोलीत थंड प्रतिसाद!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा अंतिम सामना आणि पुरेसा पाऊस न झाल्याने प्रवाहित न झालेले धबधबे या कारणांमुळे आज (रविवार) वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी आंबोलीतील वर्षा पर्यटनाला थंड प्रतिसाद मिळाला.

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा अंतिम सामना आणि पुरेसा पाऊस न झाल्याने प्रवाहित न झालेले धबधबे या कारणांमुळे आज (रविवार) वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी आंबोलीतील वर्षा पर्यटनाला थंड प्रतिसाद मिळाला.

वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून वाहतूकीचा आणि सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु नेहमीप्रमाणे गर्दी नसल्यामुळे आजच्या पर्यटनाचा पहिला रविवार सुरळीत गेला. पुढच्या रविवारी सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी माहिती दिली. आंबोलीतील वर्षा पर्यटनाला आजपासून सुरवात झाली. रविवार असल्याने मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती; मात्र धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित न झाल्याने नेहमीप्रमाणे प्रतिसाद लाभला नाही. यावर्षी पहिल्याच रविवारी जास्त गर्दी नव्हती. पाऊस नसल्याने धबधब्याला पाण्याचा प्रवाह कमी होता. आणखी धबधबे पुरेसे प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे आज भेट दिलेल्या पर्यटकांचे आकर्षण मुख्य धबधब्याकडेच होते.

पोलिस निरिक्षक सुनील धनावडे, वाहतूक पोलीस नितीन उमरजकर, प्रवीण ओरोस्कर, उपनिरीक्षक मुल्ला, सहाय्यक निरिक्षक अरुण जाधव यांनी वाहतूकीचे नियोजन योग्य पध्दतीने केले. गर्दी नसल्याने अवजड वाहने सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, मात्र कुठेही वाहतूक विस्कळीत झाली नाही. कावळेसाद, महादेवगड हिरण्यकेशी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी गस्तही ठेवली होती. धबधब्याजवळ वनखात्याने कर्मचारी ठेवले होते. तेथे वनविभागाने कर वसुली सुरू केली आहे.