प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा न घेण्याची युनियनची मागणी

अमित गवळे
बुधवार, 17 जानेवारी 2018

पाली (रायगड) : राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी न झाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनचे दिला आहे. त्यानुसार अशा मागणीचे निवेदन सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस व पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना दिले.

पाली (रायगड) : राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी न झाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनचे दिला आहे. त्यानुसार अशा मागणीचे निवेदन सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस व पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना दिले.

प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती या दिवशी गावागावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी सार्वजनिक सुटी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित रहात नाहीत. त्यातच अशा ग्रामसभांवेळी दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात. येत्या 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिला आहे. तसेच ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही युनियनने केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात एकनाथ ढाकणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. या ग्रामसभांमध्ये विकासकामांचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना दुर्दैवाने मागील काही काळात या विशेष ग्रामसभा राजकीय आखाडा बनल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामसेवक संवर्गास बसत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुटी असतानाही ग्रामसेवक संवर्ग सुटीचा त्याग करून कामकाज करीत असतो. परंतु, यावेळी ग्रामसेवकांना होणारा त्रास पाहता या दिवशी होणार्‍या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय उत्सवांवेळी ग्रामसभा न घेण्याबाबत ग्रामसेवक युनियनच्या डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा सुरुवातीच्या दोन महिन्याच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात 30 मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पध्दतीने दुसरी ग्रामसभा 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. 

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निम शासकीय कर्मचारी उपस्थित रहात नाही. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी होणारी ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी फक्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याबाबत शासनाने योग्य आदेश निर्गमित करावे अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी होणार्‍या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ढाकणे यांनी निवेदनात दिला आहे.  

गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना निवेदन देताना सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस, सचिव ए.टी.गोरड, उपाध्यक्ष एम.पी.पवार, खजिनदार एस.बी.केंद्रे, ए.एस.जमदाडे, जितेंद्र म्हात्रे, रवि ठाकूर, के.पी.पवार, ईश्वर पवार, खाडे, दिपक पारधी, सुनिल पानसरे, नितीन भोसले, पद्माकर निरगुडे, समाधान मराठे, महावीर हांगे, वर्षा जाधव, सुप्रीया जाधव, रोशनी गिजे, रश्मी म्हात्रे आदी ग्रामसेवक उपस्थीत होते. 

 

Web Title: Marathi news raigad news demand for cancellation of gramsabha