राज्यातील ग्रामसेवकांचा सर्व शासकीय व्हाॅट्सअॅप ग्रुपला रामराम

राज्यातील ग्रामसेवकांचा सर्व शासकीय व्हाॅट्सअॅप ग्रुपला रामराम

पाली : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्या सर्व सभासदांनी शासकीय व्हाॅट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीनेदेखील पाली सुधागड पंचायत समिती गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना निवेदन सादर केले आहे.

शासकीय व्हाॅटसअॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. तर रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना निवदेन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे की सोशल मीडिया व्हाॅटसअॅप सरकारी कार्यालयाकडून होत असलेल्या गैरवापर आणि दुष्परिणाम तसेच कार्यालयीन कामकाजावर होत असलेल्या विपरीत परिणामांमुळे राज्यातील, जिल्ह्यातील तसेच प्रत्येक तालुक्यातील ग्रामसेवक संवर्ग 1 जानेवारी 2018 पासून राज्यातील जि. प. व पं. स. सरकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या व्हाॅटसअॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत.

व्हाॅटसअॅपच्या अतिरेकी वापरामुळे ग्रामसेवकाच्या दैनदिन कामकाजावर त्यांच्या आरोग्यावर तसेच कार्यालयीन वेळेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामविकास कार्यक्रमाला खीळ बसत असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे. कार्यालयीन वेळेत व्हाॅटसअॅप व स्मार्टफोन वापरु नये, असे न्यायालयाने सुनावले आहे. 

शारिरीक व मेंदूचे रोग बळावत असल्याचे आयटी अभ्यासकांचे म्हणणे आहे. शासकीय वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी ग्रामसेवकांना या माध्यमाद्वारे रात्री अपरात्री केव्हाही सतत धमकी वजा आदेश करतात आणि तत्काळ कामे होण्याचे मीटिंग घेणेचे आदेश देवून नियम व कायदे मोडीत काढतात. 

या बाबीमुळे ग्रामसेवकाच्या कामावर परिणाम होताना दिसून येतो. शारीरीक व मानसिक तणाव निर्माण होतो. ग्रामसेवकांना अगोदरच अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण आहे. ग्रामसेवकांचे जीवन तणावग्रस्त होत असल्याने ग्रामसेवकांच्या आत्महत्येत वाढ होत आहे.

याकरीता दि. 1 जानेवारी 2018 पासून व्हाॅटसअॅप सोशल मीडिया वापर सरकारी ग्रुपमधून ग्रामसेवक संवर्ग यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर ई-मेल व इतर अधिकृत संगणकिय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्मार्ट फोन, एस.बी.एम ऍप, फोटो अपलोड, कापणी प्रयोग ऍप, जिओ टॅगिंग इत्यादी कामासाठी स्वत:च्या मोबाईलवर डाउनलोड करणार नाहीत.

सध्या सर्व ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वीत असून ग्रामपंचायत याकामी दरमहा 12,000 रुपये कंपनीस वर्ग करीत आहे. संगणकीय माहिती देणे, ईमेल करणे, आदी कामे डाटा अाॅपरेटरमार्फत ग्रामसेवक करुन घेतील.

शासकीय प्रणालीत काही ठिकाणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच टेलिफोन सेवा नसणे व अन्य तांत्रिक अडचणी, डाटा ऑपरेटर नसणे या बाबींमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 

दि. 31 डिसेंबर 2017 रोजी सर्व ग्रामसेवक शासकीय व्हाटसऍप ग्रुप मधून बाहेर पडले असून 1 जानेवारी 2018 पासून संगणकीय प्रणालीमार्फत शासकीय कामकाजाची माहिती देण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देतांना सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस, सचिव ए. टी. गोरड, उपाध्यक्ष एम. पी. पवार, खजिनदार एस. बी. केंद्रे, ए. एस. जमदाडे, जितेंद्र म्हात्रे, रवी ठाकूर, के. पी. पवार, ईश्वर पवार, खाडे, दिपक पारधी, सुनिल पानसरे, नितीन भोसले, पद्माकर निरगुडे, समाधान मराठे, महावीर हांगे, वर्षा जाधव, सुप्रीया जाधव, रोशनी गिजे, रश्मी म्हात्रे आदिंसह ग्रामसेवक उपस्थित  होते.

सोशल मीडिया व्हाॅटसऍप सरकारी कार्यालयाकडून होत असलेल्या गैरवापर आणि दुष्परिणाम तसेच कार्यालयीन कामकाजावर होत असलेल्या विपरीत परिणामामुळे ग्रामसेवकांवर दबाव व तणाव निर्माण होत आहे. याकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्या निर्णयाप्रमाणे व आदेशाप्रमाणे सुधागड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संघटनेच्या सभासदांनी शासकीय व्हाटसअप ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत.
- मयूर कारखानिस, अध्यक्ष, सुधागड तालुका ग्रामसेवक संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com