शिक्षकांच्या अभावामुळे पालकांनी ठोकले शाळेला टाळे

Palghar.
Palghar.

सफाळे (पालघर) : पालघर तालुक्यातील माकुणसार येथे गेल्या तीन वर्षापासून शाळेला शिक्षक न दिल्याने येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 21) सकाळी टाळे लावले. गेल्या तीन वर्षांत शाळेला तिसरयांदा टाळे लावले गेले. या वेळी मात्र हा प्रश्न जास्त चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात सोनावे तर पंधरा दिवसां पुर्वी विक्रमगड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी शाळा बाहेर भरवल्या  होत्या.

रेल्वे स्थानकाच्या लगतच चार किलोमीटर अंतरावर असलेल्या माकुणसार गावातल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षी  पहिली ते चौथीच्या वर्गात 52 विद्यार्थी शिक्षण घेत होते. योग्य शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून, ती या वर्षी 39 झाली  आहे. या शाळेत एक प्रमुख शिक्षिका कार्यरत असून एक सहशिक्षिका काम करीत आहेत. या पैकी  एक सहशिक्षिका गेल्या जून महिन्यापासून शाळेत आल्याच नाहीत. त्यांचे अध्यापन चांगले नसल्याने या शिक्षिकेची बदली करावी असे येथील पालकांचे म्हणणे आहे. या शिक्षिकेच्या विरूद्ध पालकांनी अनेक वेळा गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले. मात्र या तक्रारीची गंभीर दखल संबंधीतांनी घेतली नाही. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रामबाग येथील एका शिक्षिकेला दहा दिवस माकुणसार शाळेत अध्यापन करण्यासाठी नेमण्यात आले होते. मात्र त्या पुन्हा मुळ शाळेत गेल्याने माकुणसार येथील शाळेत पुन्हा तोच प्रश्न निर्माण झाला. यापूर्वी दोन वेळा या प्रश्नासाठी शाळेला टाळे ठोकण्यात आले होते. या वेळी पुन्हा ग्रामपंचायतीने  दि. 6 नोव्हेंबर 2017 रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन देऊन आम्हाला कायम स्वरूपी शिक्षक मिळावा असे म्हटलं होतं. मात्र 'यावेळीही प्रशासनाने दुर्लक्षच केले, तर हा प्रश्न कायमचा सुटलयाशिवाय शाळा उघडणार नाही.' असा निर्णय पालकांनी घेतला. 

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास गावातील सर्व पालकांनी एकत्र येऊन शाळेला टाळे ठोकले. तर विद्यार्थी गेटच्या बाहेरच बसून राहीले. 'आम्हाला दुसरया बाई द्या, नाहीतर आम्ही शाळेतच येणार नाही.' अशी घोषणा बाजी करून विद्यार्थ्यांनी दुपारचे डबे गेट बाहेरच खाल्ले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच जयंता पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज राऊत, उपाध्यक्ष नम्रता म्हात्रे, उपसरपंच अमोल मोहिते, सदस्या प्रगती पाटील, पल्लवी पाटील व पालक उपस्थित होते.           

'शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत टाळे ठोकून शाळा बंदच ठेवली जाईल. आमच्यावर कोणतीही कारवाई केली तरी चालेल' माकुणसारचे सरपंच जयंता पाटील म्हणाले. पालघरच्या पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतिश चौधरी म्हणाले की, 'नियमानुसार सदर शिक्षिकेची बदली करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याने सदर शिक्षिकेच्या बदलीचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची बदली झाल्याशिवाय नवीन शिक्षक नेमता येत नाही.'   

जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत आहे. विशेष म्हणजे या शाळेसाठी जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी 7 लक्ष 36 हजार 600 रुपये खर्च करून शाळेची दुरूस्ती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com