माथेरानची मिनी ट्रेन लवकरच रुळावर?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

कर्जत - नेरळ-अमन लॉज-माथेरान या मिनी ट्रेनच्या मार्गातील अमन लॉज ते माथेरान या दरम्यानच्या लोहमार्गावर दोन दिवसांपासून दुरुस्ती काम केले जात असल्याने मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

आठ महिन्यांपूर्वी मिनी ट्रेनचे काही डबे रुळावरून घसरल्याने संभाव्य धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ही सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद केली. ती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना साकडे घातले होते. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही नुकतीच यासंदर्भात प्रभू यांची भेट घेतली. आता रूळ दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे. माथेरान रेल्वेस्थानकात नव्या शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे मिनी ट्रेन सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेली ही सेवा बंद झाल्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. ही सेवा पुन्हा सुरू झाल्यास पर्यटन व्यवसायाला गती येईल, अशी आशा नगरसेवक प्रसाद सावंत यांनी व्यक्त केली.