हत्ती बंदोबस्तासाठी उपाययोजना करा

हत्ती बंदोबस्तासाठी उपाययोजना करा

दोडामार्ग - एक तर हत्तींना हटवा अन्यथा समस्त हेवाळे ग्रामवासीयांना उदारनिर्वावाहासाठी पोटगी द्या, अशी मागणी हेवाळे वासीयांनी वन खात्याकडे केली आहे. दिलेली आश्‍वासने सपशेल विसरलेल्या वनाधिकारी यांनी हत्ती बंदोबस्त करण्यासाठी नेमक्‍या काय उपाययोजना केल्या त्याची मागणी वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांच्याकडे केली. येत्या १५ दिवसांत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करावी अन्यथा जिल्हा उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा हेवाळेवासीयांनी दिला आहे.

वनक्षेत्रपाल सचिन आठवले यांची हेवाळे गावात (ता. १०) ला शेतकरी व ग्रामवासीयांसमवेत बैठक झाली. या वेळी ग्रामस्थ व शेतकरी यांनी वारंवार मागणी करूनही हत्तींना येथून का हटविले जात नाही. याबाबत प्रश्‍नांचा भडिमार केला. माणगावप्रमाणे हत्ती हटाओ मोहीम राबवावी, अशी वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई त्यावर होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय स्वतः पालकमंत्री दीपक केसरकर यांनी
 हेवाळे गावाला भेट देऊन हत्ती बंदोबस्त करू, असे आश्‍वासन दिले होते, तर १० ऑक्‍टोबरला सहायक उपवनसंरक्षक श्री. बागेवाडी यांनी ग्रामस्थांसमवेत ग्रामपंचायतमध्ये मीटिंग घेत सरपंच संदीप देसाई यांनी ग्रामस्थांच्या वतीने ११ मागण्यांचे दिलेलं निवेदन त्यावर कारवाई करू व हत्ती हटाओ 
मोहीम शासनाकडे पाठवू, असे आश्‍वासन दिले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही हालचाली वनखाते व राज्यकर्ते यांच्याकडून झाल्या नाहीत.

उलट हत्तींचा उपद्रव थेट लोकवस्तीत पोचला आहे. त्यामुळे आता पंचनामे, भरपाई काहीच नको तर तुमच्या हत्तींना तुम्ही घेऊन चला, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी या बैठकीत मांडली. 

या वेळी ग्रामस्थांच्या वतीने सूर्यकांत देसाई, लक्ष्मण गवस, आनंद शेटकर, भाऊसाहेब देसाई, अनंत देसाई, तानाजी देसाई, सुरेश ठाकूर आदींनी हत्ती उपद्रवाबाबत भूमिका मांडली. माणगाव बांबू व सागवान या पिकांना नुकसानभरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com