साळगावकरांना एकाकी पडू देणार नाही - राजन तेली

साळगावकरांना एकाकी पडू देणार नाही - राजन तेली

सावंतवाडी - मंत्रिपदाच्या जीवावर दादागिरी करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडीकरांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे आता यापुढे त्यांची मनमानी चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. नगराध्यक्ष बबन साळगावकर हे माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांना एकाकी पडू देणार नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही यानंतरसुद्धा कायम राहणार आहोत. केसरकर यांना योग्य ती समज देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे, असे श्री. तेली यांनी सांगितले. 

मृतदेह काढण्यासाठी आत्मक्‍लेश करणाऱ्या श्री. साळगावकर यांना पािठंबा देणाऱ्या श्री. तेली आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या वेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘या ठिकाणी १२ दिवसापूर्वी ख्रिश्‍चन धर्मातील एका महिलेचा मृतदेह भरवस्तीत मृतदेह दफन केला होता. या सर्व प्रकाराला संबंधित फादरच जबाबदार आहेत. त्यामुळे आता मृतदेह काढण्यात आला असला तरी हा प्रकार घडवून शांतता आणि सलोखा बिघडविण्याचा प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पोलिसांकडे करणार आहे.’’

या प्रकरणात श्री. साळगावकर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. कोणत्याही एका धर्माला कायदा हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यांच्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कायदा लवचिक करणे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत लोकांची भूमिका घेऊन आंदोलनाचा निर्णय घेणाऱ्या श्री. साळगावकर यांना श्री. केसरकर यांनी धमकी दिली हा प्रकार चुकीचा आहे. यामुळे साळगावकर यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. आणि त्यानंतर जिल्हा भाजपकडून यात लक्ष घालण्यात आल्याने हा प्रकार मार्गी लागण्यास मदत झाली. या सर्व प्रकारात एकतर्फी भूमिका घेणाऱ्या पालकमंत्र्यांना शहरातील नागरिकांनी योग्य ती जागा दाखवून दिली आहे.

या सर्व प्रकरणात पालकमंत्री दीपक केसरकर आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मताचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या फायद्यासाठी हे प्रकरण मिटविण्यापेक्षा ते कसे वाढेल यासाठी प्रयत्न केला. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. त्याच बरोबर श्री. केसरकर यांनी पालिकेचे सर्वस्वी अधिकार नगराध्यक्षांना असताना त्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकाराबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. 

डीवायएसपींशी चर्चा  
मृतदेह बाहेर काढल्यानंतर श्री. तेली यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांची भेट घेतली. तसेच हा प्रकार होण्यास जबाबदार ठरणाऱ्या संबंधित फादर व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानुसार पुढील कारवाई आपण करणार असल्याचे गवस यांनी सांगितले. 

त्या पोलिसाच्या चौकशीची मागणी 
या वेळी माडखोल ग्रामस्थांतर्फे तेथील बीट हाताळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जात आहे, अशी तक्रार तेली यांच्याकडून श्री. गवस यांच्याकडे मांडली. संबंधिताची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे श्री. गवस यांनी सांगितले. या वेळी महेश सारंग, राजन राऊळ, बाळू शिरसाट, दत्ता कोळमेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com