वेळास ‘नॉट रिचेबल’; पर्यटकांनी फिरवली पाठ

वेळास - येथे केलेल्या खोदाईमुळे गावात रस्त्याने जाताना वाहनचालक व ग्रामस्थांपुढे अडचणी उभ्या आहेत.
वेळास - येथे केलेल्या खोदाईमुळे गावात रस्त्याने जाताना वाहनचालक व ग्रामस्थांपुढे अडचणी उभ्या आहेत.

कासव महोत्सवावर अरिष्ट - रस्ता खोदाईने अडचणीत वाढ

मंडणगड - तालुक्‍यातील समुद्रकिनारा असलेले एकच वेळास गाव कासव संवर्धनाच्या निमित्ताने जगाच्या नकाशावर झळकले असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानापासून ते अद्यापही कोसो दूर आहे. या गावात कुठल्याही कंपनीचा मोबाइल टॉवर नाही. त्यामुळे भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. पर्यायाने पर्यटक अनेक वेळा वेळासकडे पाठच फिरवतात.

ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यासाठी केबल टाकण्यात येत आहेत. ४ डिसेंबरपासून या कामाला सुरवात झाली आहे. खोदाई सुरू असताना बीएसएनएलच्या टेलिफोन केबल चार ठिकाणी तुटल्या. त्यामुळे या परिसरातील दूरध्वनी संच महिनाभरापासून बंद आहेत. परिणामी कुठलाही संपर्क होत नाही. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महिनाभर दूरध्वनी संच बंद असल्यामुळे संपर्क करण्यासाठी गावाच्या वेशीबाहेर यावे लागते. या परिसरात मोबाइल टॉवर उभारावेत, अशी अनेकदा मागणी करण्यात आली; परंतु त्याकडे काणाडोळा करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियाची चलती आहे; मात्र येथील तरुणाईला प्रामुख्याने आणि उर्वरितांना सोशल मीडियापासून कोणताही फायदा होऊ शकत नाही.

पर्यटकांशी संपर्क तर अशक्‍यच बनला आहे. या गावात सुमारे ३५ घरांमध्ये घरगुती जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु या रोजगारालाही सध्या खीळ बसली आहे.

दोन किलोमीटर रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने एसटी वाहतुकीला फटका बसला आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या या गावाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची खोदाई करत असताना ग्रामपंचायतीला विश्‍वासात घेण्यात आलेले नसल्याचे सरपंच प्रल्हाद तोडणकर यांनी सांगितले. रस्ता खोदाई केल्यानंतर त्याचा समतोल राखण्यात आलेला नाही. खोदाई करताना नळ-पाणी योजनेचे पाइपही तुटले. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. पाइप दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीने स्वतःच्या खर्चातून केले. रस्ता खोदाईचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला. त्यांना सुमारे सात किलोमीटरपर्यंत चालत यावे लागले. गैरसोयीबद्दल तहसीलदारांकडे संपर्क करण्यात आला आहे. तेव्हा योग्य तोडगा काढण्याचे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले आहे.

राज्यभरातील काही कंपन्या आमच्याकडे संपर्क करून आपल्या टुर्स आयोजित करत असतात; मात्र संपर्क होत नसल्याने त्याचाही पर्यटनाला फटका बसत आहे. आगामी कासव महोत्सवावरही विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
- मोहन उपाध्ये, कासवमित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com