मोडयात्रेने सोहळ्याची सांगता

मोडयात्रेने सोहळ्याची सांगता

मालवण - दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेची सांगता आज मोडयात्रेने झाली. दीड दिवसाच्या या यात्रेत सुमारे सात लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आजच्या दुसऱ्या दिवशीही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नोटाबंदीचा फटका कालच्या दिवशी छोट्या व्यापाऱ्यांना बसल्याचे दिसून आले. मात्र आजच्या मोडयात्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील तसेच अन्य भागांतून आलेल्या भाविकांनी केलेल्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेस बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह सिनेकलावंतांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेत साकडे घातले. सध्या परीक्षांचा हंगाम असल्याने तसेच यात्रा गुरुवारी आल्याने मुंबईकर चाकरमानी उशिराने जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत यात्रेत गर्दी झाली नव्हती. मध्यरात्रीपासूनच दहा रांगांच्या माध्यमातून देवीच्या दर्शनाची सुविधा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने उपलब्ध करून दिल्याने भाविकांना देवीचे तत्काळ दर्शन मिळत होते. ज्या भाविकांना केवळ दर्शन घ्यायचे होते, अशा भाविकांसाठी मुखदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. याचा भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळनंतर आंगणेवाडीत लाखो भाविकांचा जनसागर उसळला. भराडी मातेच्या जयघोषाने आंगणेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. सायंकाळनंतर झालेल्या गर्दीमुळे भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा देवीच्या दर्शनासाठी लागल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजता यात्रोत्सवातील महत्त्वाचा ताटे लावण्याचा कार्यक्रम झाला. आंगणेवाडीतील विविध वाड्यांमधील माहेरवाशिणी सुवासिनी 

डोक्‍यावर प्रसादाची ताटे घेऊन मंदिरात दाखल होत होत्या. यात्रोत्सवातील ताटे लावण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत देवीचे दर्शन बंद करण्यात आले होते. 

भराडी देवी मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे खास आकर्षण ठरली होती. यात्रेतील हे विलोभनीय दृश्‍य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी युवा वर्गाची मोठी गर्दी झाली होती. देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांना सुलभरीत्या दर्शन मिळावे यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेताना दिसत होते. भाविकांना कोणत्याही समस्या भासू नयेत यासाठी महसूल, पंचायत समिती प्रशासन मसुरे ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत होते. देवीच्या दर्शनानंतर सर्वाधिक गर्दी ही मळ्यात असणाऱ्या आकाश पाळणे, मौत का कुऑ, अन्य चिमुकल्यांच्या खेळांच्या विविध प्रकारांकडे तसेच खासदार चषक राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विविध हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या ठिकाणीही भाविकांची गर्दी होत होती. मात्र दरवर्षीच्या तुलनेत जी उलाढाल अपेक्षित होती, ती न झाल्याचे चित्र पहिल्या दिवशी दिसून आले. राज्याच्या विविध भागातून यात्रेच्या निमित्ताने छोटे व्यापारी, चादर, बेडशीट, अन्य गृहोपयोगी साहित्यांच्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी त्यांचा यात्रेत मोठा व्यवसाय होत असल्याचे दिसून यायचे. मात्र यावर्षी या छोट्या व्यावसायिकांना नोटाबंदीच्या फटका बसल्याचे दिसून आहे. येण्या-जाण्याचा खर्च तरी सुटावा या हेतूने या छोट्या व्यावसायिकांना दरात कपात करून साहित्याची विक्री करावी लागली. यावर्षी प्रथमच नोटाबंदीचा फटका आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना बसल्याचे अनेक छोट्या व्यावसायिकांनी सांगितले.  

यात्रोत्सवात भाजपच्या वतीने मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिर घेतले होते. या शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला बच तगटांनी लावलेल्या विविध स्टॉल्समधून विविध पदार्थाची चांगली विक्री झाली. यातून व्यावसायिकांना चांगले उत्पन्नही मिळाले. आजच्या दुसऱ्या दिवशीही पहाटेपासून भाविक देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत दाखल होत होते. दुसऱ्या दिवशीची यात्रा मोड यात्रा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे अवजारे, गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी जे छोटे व्यावसायिक निराश बनले होते, त्यांना भाविकांकडून झालेल्या खरेदीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

यात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंगणेवाडीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी यात्रेतील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. गर्दीचा फायदा घेत होणाऱ्या चोरीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिसांचे खास फिरते पथकही कार्यरत होते. टेहळणी मनोऱ्यांवरून यात्रेच्या ठिकाणी पोलिसांचे नियंत्रण होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाविकांच्या प्रवासासाठी एस.टी. प्रशासनाने चांगले नियोजन केले होते. यावर्षी परीक्षांचा हंगाम, नोटाबंदीमुळे चाकरमान्यांचे आगमन कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे एसटी, रिक्षा, सहा आसनी रिक्षा व्यावसायिक यांनाही याचा काही प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले. आजच्या दुसऱ्या दिवशीही एसटी प्रशासनाने भाविकांसाठी जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. सायंकाळी उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. उशिरा विधिवत कार्यक्रम पार पडल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

प्रसाद मिळविण्यासाठी निवासस्थानी गर्दी
दरम्यान, रात्री साडेअकरा वाजल्यानंतर देवी दर्शनाच्या रांगांना पुन्हा सुरवात झाली. ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा माहेरवाशिणी माघारी परतत होत्या. त्यांच्याकडून प्रसाद मिळविण्यासाठी विविध मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. प्रसाद उडविण्याची प्रथा काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. त्यामुळे ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आंगणे ग्रामस्थांच्या घरीच भाविकांना देवीचा प्रसाद दिला जातो. त्यामुळे हा प्रसाद मिळविण्यासाठी अनेक भाविकांनी आंगणेवाडीतील विविध कुटुंबीयांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com