आता मिशन माकडताप नियंत्रण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही.

आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असून, त्यातील ३८ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सटमटवाडीमधीलच आणखी एकाचा रक्तनमुना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी रात्री त्याला बांदा वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले. 

बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही.

आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले असून, त्यातील ३८ जणांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सटमटवाडीमधीलच आणखी एकाचा रक्तनमुना पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी रात्री त्याला बांदा वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले. 

येथे सोमवारी (ता. ६) पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा केल्यामुळे खडसावले होते. त्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने जिल्हाभरातील कर्मचारी बांदा परिसरात काम करण्यासाठी पाठविले असून, वनविभागाचे ५३ आणि पशुवैद्यकीय विभागाचे दररोज पाच जणांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे.

डिसेंबरअखेरपासून बांदा सटमटवाडी परिसरात माकडतापाचे रुग्ण आढळू लागले. त्या वेळी आरोग्य विभाग वगळता कोणताच विभाग याबाबत गंभीर नव्हता. ३ तारखेला बांदा सटमटवाडी परिसरातील दोघांचा माकडतापने बळी घेतल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झाले. या घटनेनंतर लोकप्रतिनिधींनाही जाग आली. राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांदा आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यानंतर ६ ला सायंकाळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ग्रामस्थांनी वनविभाग व पशुविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही साथ रोग जास्त बळावल्याचा आरोप केला. याबाबत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांसमोरच याबाबत आक्रमक भूमिका घेत हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच उद्यापासून तातडीने जिल्हाभरातील कर्मचारी घेऊन बांदा शहर आणि त्याला जोडणाऱ्या पाच गावांत यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले.

पालकमंत्र्याच्या आदेशानंतरच वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. वनविभागामार्फत मंगळवारी (ता. ७) २८ कर्मचारी या ठिकाणी परिसरात तपासणीसाठी पाठविले असून, आज सकाळी कणकवली येथून १२, कडावलमधून ६, आंबोलीतून १०, कुडाळहून ८ आणि सावंतवाडीमधून १८ कर्मचारी दाखल झाले आहेत. यात वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनमजूर असे एकूण ५४ कर्मचारी या भागात तैनात केले आहेत. वनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे कर्मचारी काम करीत असून, अजूनपर्यंत त्यांना तीन मृत माकडे आढळली आहेत. ते सध्या पाच पाच जणांच्या तुकड्या करून ग्रामस्थ सांगतील त्या त्या ठिकाणी जंगलाची पाहणी करीत आहेत. यात गाळेल, बांदासटमटवाडी, निमजगा, डिंगणे, डेगवे अणि इतरत्र भागात हे कर्मचारी काम करीत आहेत,

तर पशुसंवर्धन विभागामार्फतही मोठी मोहीम हाती घेतली आहे. पशुसंवर्धन विभाग उपायुक्त वाय. ए. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. एम. जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत काम करीत असून, त्यांनी बांदा सटमटवाडी परिसरात आतापर्यंत १७२ लोकांना भेट दिली आहे. त्यात ७३ गोठ्यांभोवती फवारणी करून ३३१ जनावरांना गोचीड निर्मूलनासाठी लस टोचणी केली आहे. या भागातील ग्रामस्थ सांगतील त्या ठिकाणी आपण काम करीत असल्याचे या विभागामार्फत सांगण्यात आले. दररोज या ठिकाणी पाच जणांचे पथक कार्यरत राहणार असून, या ठिकाणी परिसर निर्जंतूक करण्याचे काम सदर विभाग करणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फतही यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात पाच वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सेवक, तीन आरोग्य सेविका, दोन सुपरवायझर आणि एक तालुकास्तरावरील कर्मचारी पुरविण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा काम करीत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमाण सुरू आहे. अजून एक सटमटवाडीमधील ग्रामस्थ पॉझिटिव्ह मिळाला असून, त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९९ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यातील ३८ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यातील चार जणांचा मुत्यू झाला आहे.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी आज बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही मदत लागल्यास संपर्क करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी येथे दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूसही केली. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मंत्रालयात आज होणार बैठक...
माकडताप साथ नियंत्रणात आणण्यासंबंधी बाधित माकडांवर योग्य ती उपाययोजना करण्यासंबंधी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्यविभाग मुख्यसचिव, सचिव पशुसंवर्धन विभाग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग, संचालक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि उपवनसंरक्षक उपस्थित राहणार आहेत. 

बांदा भाजपतर्फे वनमंत्र्यांची भेट...
बांदा भाजपतर्फे माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेण्यात आली. त्यांना वन विभागाला याबाबत ठोस पाऊल उचलण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, बांदा पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

Web Title: monkey flu control mission