अध्यक्ष निवडीतही मुंबई पॅटर्नच! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेने मुंबई पॅटर्नचा अवलंब केला. याआधी सभापती निवडीतही हाच फॉर्म्युला होता. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना कदर करते, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. रत्नागिरीच्या सौ. स्नेहा सावंत यांना अध्यक्ष, संतोष थेराडेंना उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच सव्वा वर्षानंतरचे उमेदवार जाहीर करून इच्छुकांमध्ये गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे. 

रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेने मुंबई पॅटर्नचा अवलंब केला. याआधी सभापती निवडीतही हाच फॉर्म्युला होता. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना कदर करते, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. रत्नागिरीच्या सौ. स्नेहा सावंत यांना अध्यक्ष, संतोष थेराडेंना उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच सव्वा वर्षानंतरचे उमेदवार जाहीर करून इच्छुकांमध्ये गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे. 

मुंबई महापालिकेत महापौरांपासून ते स्थायी समिती सभापतींची नियुक्‍ती करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मुंबईतील तगड्या इच्छुकांना धक्‍का बसला. हेच तंत्र शिवसेनेने कोकणासह राज्यात राबवले. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरवातीला सौ. रचना महाडिक यांचे नाव होते. संगमेश्‍वर, रत्नागिरी या तालुक्‍यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले. लांजा-राजापूर तालुका भाजपमुक्‍त झाला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीत चुरस निर्माण झाली होती. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला. शिरगाव गटातून निवडून आलेल्या सौ. स्नेहा सावंत यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नीला पराभूत करून सौ. सावंत निवडून आल्याने त्यांना संधी मिळावी, असा आग्रह स्थानिक पातळीवरून धरण्यात आला. 

सौ. महाडिक यांनी पूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. अनुभवामुळे त्यांचे पारडे जड होते; परंतु पंधरा दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. कोणा एकाची मक्‍तेदारी राहते, असा ठपका बसू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सतर्क आहेत. महाडिक यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा असल्याने अध्यक्षपद दिले तर त्यातून अंतर्गत कलहाला निमंत्रण मिळेल, अशी भीती वरिष्ठांमध्ये होती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संगमेश्‍वरात उमेदवारी वाटपावरून झालेल्या बंडाची किनारही या मागे आहे. त्याचबरोबर रत्नागिरीला पद मिळावे, यासाठी आमदार सामंत यांनीही जोरकस प्रयत्न केले होते. त्याला तेवढेच यश मिळाल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे जिल्हाप्रमुखांसोबत संघटनेत इतरांच्या मतालाही महत्त्व मिळाले आहे. 

रात्री उशिरा झाला निर्णय... 
रात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात उमेदवार निवडीचा खल सुरू होता. संपर्कप्रमुखांसह आमदार, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेवटपर्यंत साळवी की सावंत यावर चर्चा येऊन ठेपली होती. त्यात पहिली संधी रत्नागिरीला देण्याचा निर्णय झाला. संगमेश्‍वरला उपाध्यक्षपद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सौ. स्वरुपा साळवी आणि उपाध्यक्षपदी सोनू गोवळ यांना संधी दिली आहे. सव्वा वर्षानंतरचे उमेदवार घोषित करून शिवसेनेने आणखी एक मोठा धक्‍का दिला आहे. 

विविध पदांचे उमेदवार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने ठरविण्यात आले आहेत. श्री. ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार केला होता. याची पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांना कल्पना आहे. त्याप्रमाणेच ही निवड केली आहे. 
- विजय कदम, संपर्कप्रमुख, रत्नागिरी 

Web Title: Mumbai pattern