नारायण राणे म्हणतात, संघर्ष यात्रेची माहितीच नाही !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण संघर्ष यात्रा काढत आहेत; मात्र या यात्रेविषयीची मला कोणतीही माहिती नाही. जिल्ह्यात संघर्ष यात्रा काढल्यास त्यात मी सहभागी होणार आहे.”

- नारायण राणे, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री

मालवण : काँग्रेसच्या संघर्ष यात्रेबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही; मात्र जिल्ह्यात संघर्ष यात्रा झाल्यास त्यात सहभागी होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज (शनिवार) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ असून ती पांढर्‍या पायाच्या सत्ताधार्‍यांमुळेच आली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मालवण दौर्‍यावर आलेल्या श्री. राणे यांनी नीलरत्न बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. राणे म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण संघर्ष यात्रा काढत आहेत; मात्र या यात्रेविषयीची मला कोणतीही माहिती नाही. जिल्ह्यात संघर्ष यात्रा काढल्यास त्यात मी सहभागी होणार आहे.”

आमच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा टँकरमुक्त होता. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. याला पांढर्‍या पायाचे सत्ताधारीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता जिल्ह्यातील एकाही बागायतदाराने याप्रश्‍नी आपली भेट घेतलेली नाही, जर खरेच नुकसान झाले असेल तर आपण यासंदर्भात आवाज उठवू. कारण स्थानिक आमदारांना या नुकसानीची जाणीवच नसल्याने ते सभागृहात प्रश्‍न उपस्थित करू शकत नाही. मात्र बागायतदारांच्या समस्येसंदर्भात आपण आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देऊ असे स्पष्ट केले.