राष्ट्रवादी होणार पालिकेतून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कदमांच्या राजीनाम्यामुळे चिपळुणातील राज्य खालसा; चार नगरसेवक सोबत असल्याचा दावा

चिपळूण - पालिकेत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक माझ्याबरोबर असल्याचा दावा पक्षातून बाहेर पडलेले माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांचा दावा खरा ठरल्यास चिपळूण पालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार होणार आहे. 

कदमांच्या राजीनाम्यामुळे चिपळुणातील राज्य खालसा; चार नगरसेवक सोबत असल्याचा दावा

चिपळूण - पालिकेत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही नगरसेवक माझ्याबरोबर असल्याचा दावा पक्षातून बाहेर पडलेले माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांचा दावा खरा ठरल्यास चिपळूण पालिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार होणार आहे. 

पालिकेतूनच रमेश कदमांची राजकीय कारर्किद सुरू झाली. ४० वर्ष त्यांनी पालिकेवर पर्यायाने चिपळूण शहरावर राज्य केले. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले. त्यामुळे रमेश कदमांची पालिकेतील सत्ता संपुष्टात आली. 
केंद्र आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नसताना पक्षाच्या नेत्यांनी पालिका निवडणुकीत आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना यश आले. 

मात्र चिपळूण पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पाच वर्ष समाधानकारक कामगिरी करता आली नाही. २०११ च्या निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्‍वासन पाच वर्षांत पूर्ण 
झाले नाही. 

रस्ते, सांस्कृतिक केंद्र, भाजी मंडई, मटण आणि मच्छीमार्केट सारखे अनेक प्रकल्प रखडले. राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरवातीपासूनच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचे आरोप केले. 

पाच वर्षात रमेश कदम किंवा पक्षीय स्तरावर नाराजांना थोपवण्याचे काम झाले नाही. कदम केवळ स्वार्थासाठी कार्यकर्ते आणि पालिकेचा वापर करतात, असे त्यांच्या विरोधकांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. सत्तेत सहभागी असलेले काँग्रेसचे नगरसेवकही राष्ट्रवादीच्या विरोधात गेले. 

पालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. तेथेच कदमांना ५० टक्के धक्का बसला होता. त्यानंतर कदमांच्या अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जाहीर आरोप करायला सुरवात केल्यानंतर ४० वर्षांची पालिकेतील सत्ता संपणार हे चित्र स्पष्ट झाले होते. 
पालिका निवडणुकीच्या दरम्यान कदमांनी अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आभाळच फाटल्यामुळे ठिगळ कुठे लावणार अशी परिस्थिती होती. राष्ट्रवादीचे केवळ चार नगरसेवक निवडून आले. पहिल्या क्रमांकाची राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. सध्या निवडून आलेले नगरसेवक खरोखरच कदम यांच्यासोबत गेले तर पक्षाचे पालिकेतील अस्तित्व संपेल. 

रमेश कदमांची कारकिर्द
काँग्रेसचे नगरसेवक म्हणून १९७४ मध्ये रमेश कदमांनी पालिकेत प्रवेश केला. १९८६ ला ते नगराध्यक्ष झाले. दहा वर्ष नगराध्यक्ष होते. त्यानंतर १९९९ मध्ये कदम व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीत गेले. १९९९, २००४ आणि २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली. केवळ २००५ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. १९९९ ला उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती. २०१४ मध्ये शेकापच्या तिकिटावर त्यांनी रायगड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती.

Web Title: NCP will municipal exile