गुंज आश्रमशाळेची नवीन इमारत रखडली 

दिलीप  पाटील 
गुरुवार, 24 मे 2018

 

वाडा - तालुक्यातील गुंज येथे आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. सदर शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून प्रशासनाने ऑगस्ट 2016 रोजी येथील विद्यार्थांचे पाली येथील आश्रमशाळेच्या इमारतीत स्थलांतर केले होते. मात्र 21 महिन्यांनंतरही इमारतीला मंजूरी मिळाली नसल्याने विद्यार्थांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही इमारतीला मंजुरी न मिळाल्याने आदिवासी विकास विभागाची उदासीनता दिसून येत असून, पालक संताप व्यक्त करीत आहेत. 

 

वाडा - तालुक्यातील गुंज येथे आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. सदर शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सुरक्षितता म्हणून प्रशासनाने ऑगस्ट 2016 रोजी येथील विद्यार्थांचे पाली येथील आश्रमशाळेच्या इमारतीत स्थलांतर केले होते. मात्र 21 महिन्यांनंतरही इमारतीला मंजूरी मिळाली नसल्याने विद्यार्थांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही इमारतीला मंजुरी न मिळाल्याने आदिवासी विकास विभागाची उदासीनता दिसून येत असून, पालक संताप व्यक्त करीत आहेत. 

आदिवासी विकास विभागाकडून राज्यभरात शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. वाडा तालुक्यामध्ये गुंज, गुहीर, पाली, गारगाव येथे आश्रमशाळा आहेत. गुंज येथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत वर्ग असून, 500 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 400 विद्यार्थी निवासी असून, 100 विद्यार्थी हे बहिस्थ आहेत. या आश्रमशाळेच्या एकूण 14 खोल्या असून, त्या 35 ते 40 वर्षापूर्वी बांधल्या असल्याने कमकुवत झाल्या होत्या. दिवसा या खोल्यामध्ये शिकवले जायचे तर रात्री या खोल्यात विद्यार्थी राहत होते. 

दरम्यान, 2013 जुलै महिन्यात पावसाळ्यात एका खोलीची पडझड झाली होती. त्यात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. त्याच्यावर ठाण्यातील रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. 2016 मध्येही मुसळधार पावसात एका खोलीची पडझड झाली मात्र यावेळी कोणीही विद्यार्थी सुदैवाने जखमी झाले नाही. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि लागलीच त्यांनी विद्यार्थ्यांचे पाली येथील आश्रमशाळेत स्थलांतर केले.  

ऑगस्ट 2016 मध्ये येथील विद्यार्थांना पाली येथील आश्रमशाळेत स्थलांतरित केले आहे. मात्र येथेही मुबलक जागा नसल्याने विद्यार्थांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विद्यार्थाच्या मानाने तेवढी शौचालये किंवा स्थानगृह नाहीत. पाणीही विद्यार्थांना तळमजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर स्वतःलाच न्यावे लागत आहे. विद्यार्थी येथे दाटीवाटीने राहात असून, एकाच वर्गात दाटीवाटीने शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थांचे   शैक्षणिक नुकसान होत असल्याचे येथील पालकांचे म्हणणे आहे. शिवाय शिक्षकांनाही येथे निवासी संकुल नसल्याने त्यांना दररोज ये-जा करावी लागते. 21 महिन्याचा प्रदीर्घ काळ लोटला असतानाही अद्याप आश्रमशाळेची नवीन इमारत मंजूर झालेली नाही. नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात धुळ खात पडून आहे. तसेच तो मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थांचे हाल संपता संपत नाहीत. 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा हे वाड्याचे सुपुत्र असुन, त्यांचे याकडे पूर्णत दुर्लक्ष आहे. तालुक्यातील आश्रमशाळांकडे बघायला त्यांना वेळ नाही. तर राज्यातील काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.
सुरेश पवार, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

गुंज आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात गेला असून, मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 
प्रसाद खेडकर मुख्याध्यापक, गुंज आश्रमशाळा 

गुंज आश्रमशाळेच्या नवीन इमारतीला शासन व प्रशासनाने तत्काळ मंजूरी देऊन आश्रमशाळेचे काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.  मेहुल गिरी

Web Title: A new building of Gunjhal Ashram was laid