न्हावेली-रेवटेवाडीचा संपर्क यंदाही तुटलेलाच....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सावंतवाडी - न्हावेलीतील रेवटेवाडी-भोमवाडी साकव पूल वाहून गेल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. त्यामुळे रेवटेवाडी वस्तीचा संपर्क गावापासून तुटला होता. याठिकाणी पूल उभारण्याचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीकडून पाहणी केल्यावर निश्‍चित केले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सावंतवाडी - न्हावेलीतील रेवटेवाडी-भोमवाडी साकव पूल वाहून गेल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. त्यामुळे रेवटेवाडी वस्तीचा संपर्क गावापासून तुटला होता. याठिकाणी पूल उभारण्याचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीकडून पाहणी केल्यावर निश्‍चित केले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकीकडे गाव दुसरीकडे वाडी अशी रचना असलेल्या न्हावेली गावात आता पुन्हा एकदा तोंडावर आलेल्या पावसाळ्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. गेल्या पावसाळ्यात याठिकाणी असलेले न्हावेली रेवटेवाडी पूल पाण्याच्या वाढत्या झोताबरोबर वाहून गेले होते. दरम्यान त्याआधी या ठिकाणी पक्के पूल व्हावे अशी मागणी कित्येक वर्षापासून न्हावेली रेवटेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. पूल वाहून गेल्यावर तत्काळ बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. पाटील यांनी न्हावेली सरपंच शरद धाऊसकर, तलाठी आनंद गावडे, ग्रामसेवक तृप्ती राणे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मयेकर, यशवंत दाभोलकर, बाबल परब व इतर काही ग्रामस्थांनी पहाणी केली होती. या वेळी या पुलाच्या बांधकामाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते.

तशी माहिती ग्रामपंचायत कार्यकारीणीला देण्यात आली होती. सरपंच धाऊसकर यांनी याबाबत बांधकाम विभागाला पावसाळ्याआधी पुलाचे बांधकाम तात्काळ घेण्यात यावे अशी संपर्क व भेट घेऊन विनंतीही केली होती; मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल वा कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभागाने आपले हात झटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांत संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात आरोस दांडेली मार्गे वळसा घालण्याची वेळ दुचाकी व ग्रामस्थांवर येणार आहे. बांधकाम विभागाच्या कामचुकारपणाचा नाहक त्रास ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे. 

साधारणतः तीनशे ते साडेतीनशे वस्तीची न्हावेली गावातील ही रेवटेवाडी आहे. येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामदैवत, न्हावेली उपकेंद्र तसेच इतर कामासाठी या पुलाचा ये-जा करण्यासाठी तसेच वाहतुकिसाठी जवळचा मार्ग म्हणून वापर व्हायचा. शहराकडे येण्यासाठीही अनेक खासगी वाहने यामार्गावरुन येजा करीत असायची यासाठी साधारणतः एक किलोमीटरचे अंतर मोजावे लागे. परतु या एक किलोमीटर ऐवजी सुमारे ५ किलोमीटरचे अंतर मोजावे लागणार आहे. आता या पुलाअभावी दांडेलीमार्गे कार्यालये व शहराकडे ये-जा करण्याची वेळ येणार आहे. आणि त्यासाठी उध्वस्त झालेल्या पुलातुन काही पादचारी उतरुन येजा करीत होते; मात्र पावसाळ्यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते शक्‍य नाही. काही जणांकडून कमी अंतरासाठी पाण्यात उतरुन जाणाऱ्यावर वाहुन जाण्याचा धोकाही ग्रामस्थांना पत्कारण्याची वेळ निर्माण होईल.

...तर भर पावसात उपोषण
पुलाचे कामासंबंधात कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल मजबूत बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. बांधकामाकडे दुर्लक्ष करून सर्वसाधारण जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार होत आहे. पावसाळा सुरू होण्याआधी पुलाचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास भर पावसात ग्रामस्थांसोबत उपोषणास बसण्याचा इशारा न्हावेली सरपंच शरद धाऊसकर यांनी दिला आहे.

Web Title: nhaveli-revatewadi connection cut