निंबाजी गिते यांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार

geete
geete

पाली - सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर केंद्रस्तरावर विविध शैक्षणिक प्रयोगांच्या सहय्याने राजिप शाळांची सर्वांगीण प्रगती व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करणारे व पनवेल येथील तळोजा केंद्रावर चार वर्ष काम करणारे केंद्रप्रमुख निंबाजी कृष्णाजी गिते यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दलच नुकतेच त्यांना पुणे येथे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशन तर्फे गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. आजच्या स्पर्धेच्या व संगणकीय युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेतील प्रत्येक मुलाने अपेक्षित गुणवत्ता साध्य केली पाहिजे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नसून ती सार्वत्रिक झाली पाहिजे. गुणवत्ता, विकास म्हणजेच मुलात दिसणाऱ्या सर्व क्षमतांचे विकसन होय. हिच गुणवत्ता साध्य करण्यासाठी केंद्रप्रमुख निंबाजी गिते नेहमीच प्रयत्नशिल असतात. त्याचबरोबर एक अभ्यासू, प्रभावी व मधूर सुत्रसंचालक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशन आयोजित शिक्षण परिषद व राज्यस्तरीय गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक सभागृहात संपन्न झाला. 

यावेळी राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, विद्या परिषद तथा बालभारती महाराष्ट्र राज्य संचालक सुनील मगर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, डीआयसीपीइडी च्या प्राचार्या कमलाबाई आवटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन मोरे,प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशनचे राज्याध्यक्ष रामराव जगदाळे व आदी मान्यवरांसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील केंद्रप्रमुख मोठ्या उपस्थित होते.

नवनिर्मितीचा ध्यास.… आणि शाबासकीची थाप...
निंबाजी गीते यांच्या कार्याचा आढावा घेतांना महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख असोसिएशनचे राज्याध्यक्ष रामराव जगदाळे म्हणाले, ''महाराष्ट्रातील सीआरपीची तळोजा केंद्रातील पहिली वेबसाईट निर्मिती, रायगड जिल्यातील पहिले ऑफ लाईन अॅपची निर्मिती, पनवेल मधील पहिले ज्ञान रचनावादी केंद्र निंबाजी गिते यांनी तयार केले. महाड येथे विभागीय शिक्षण परिषदेत रायगडचे प्रतिनिधित्व म्हणून सादरीकरण केले. त्यासाठी राजीप शिक्षण सभापती यांच्या हस्ते गौरव व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फौंडेशनचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. सरल प्रणाली, शिक्षणाची वारी, डिजिटल शाळा, आयएसओ शाळा, टेक्‍नोसॅव्ही शिक्षकांना प्रोत्साहन देऊन त्यांनी केंदप्रमुख म्हणून चांगले काम केले आहे. गीते हे सध्या विद्या प्राधिकरण मुंबई येथे राज्यस्तरीय तज्ञ म्हणून काम करीत आहेत.

केद्र प्रमुखांची जबाबदारी महत्वाची
यावेळी प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले, ''देश पातळीवर महाराष्ट्र राज्याचा पहिल्या तीन क्रमांक येण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम हाती घेतला. परंतु, आज सुद्धा विद्यार्थ्यांची प्रगती फारशी समाधानकारक नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता आणि गणितातील भागाकार व इतर क्रिया त्यांना येत नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव विविध जिल्ह्यातील शाळांच्या भेटीच्या वेळी अनुभवास मिळाला. शाळांची प्रगती होण्यासाठी केंद्रप्रमुखाची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे असे नंदकुमार म्हणाले. राज्यातील एकही मुल न शिकता राहणार नाही असे आदशर्वत काम करा असे आवाहन सचिव नंदकुमार यांनी यावेळी उपस्थित राज्यातील केंद्रप्रमुख यांना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com