अतिवृष्टीमुळे सात धबधब्यांवर नो एंट्री

अतिवृष्टीमुळे सात धबधब्यांवर नो एंट्री

रत्नागिरी - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध  धबधब्यांवर जाण्यास ‘नो एंट्री’चा निर्णय घेतला असून त्या कालावधीत पोलिस तैनात केला जाणार आहे. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टी विषयक इशारा दिल्यामुळे सध्या धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा या जिल्ह्यातील अन्य धबधबे व धरणांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांसाठी बैठक झाली. सवतकडा येथील घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. भविष्यात हे टाळण्यासाठी जिल्हा परिषद, तहसील प्रशासन, ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. नदी उगमाजवळ पाऊस पडला की धबधब्याचे पाणी वाढते. तोच प्रकार सवतकडा येथे घडला. अचानक वाढलेले पाणी पर्यटकांच्या लक्षात आले नाही. हे लक्षात घेऊन हवामान विभागाकडून अंदाज वर्तविल्यानंतर  धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करु शकतील; परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी अतिवृष्टींचा संदेश असलेल्या काळात धबधब्यांवर पोलिसांची नियुक्‍ती केली जाईल. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून धोक्‍याच्या ठिकाणी बॅरिकेटस्‌ आणि फलक लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यात बावीस धबधबे असून त्यातील सात प्रसिध्द आहेत. तेथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. अतिवृष्टीची सूचना प्रसिध्द केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितले.

‘रत्नदुर्ग’च्या सदस्यांचा सत्कार
पर्यटकांची सुटका करणाऱ्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स सदस्यांचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अभिनंदन केले असून त्यांचा जिल्हाप्रशासनाकडून विशेष सन्मान केला जाणार आहे.

धबधब्यांवर लोक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे रेस्क्‍यू करताना अडथळे येतात. ग्रामपंचायतीने परिसरात सुविधा दिल्या पाहिजेत. रविवारी सवतकडा येथे दोन हजार पर्यटक होते. पाणी वाढल्यानंतर ते बाहेर येत होते; मात्र अशावेळी अफवा पसरवू नयेत.
- गणेश चौघुले, रत्नदुर्ग सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com