हापूसच्या युरोप वारीत 'ना हरकत'चा अडथळा

राजेश कळंबटे
शुक्रवार, 17 मार्च 2017

पॅक हाउसला प्रतीक्षा प्रमाणपत्राची; मुहूर्त हुकण्याची भीती

पॅक हाउसला प्रतीक्षा प्रमाणपत्राची; मुहूर्त हुकण्याची भीती
रत्नागिरी - वातावरण बदलाच्या तडाख्यात सापडलेल्या हापूसच्या युरोप वारीच्या मुहूर्तात या वर्षी अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आंबा निर्यात करण्यापूर्वी पॅक हाउसमध्ये उष्णजल किंवा बाष्पजल प्रक्रिया अत्यावश्‍यक आहे. त्या पॅक हाउसना क्‍वारंटाइन विभागाकडून "ना हरकत" प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी पॅक हाउसची पाहणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे निर्यातीला आंबा उपलब्ध झाला तरीही तो प्रक्रिया करता येणार नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापूर्वी प्रमाणपत्र मिळणे आवश्‍यक आहे. अन्यथा युरोप निर्यातीचा मुहूर्त लांबण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे युरोपच्या हापूस वारीत दोन वर्षांपूर्वी अडथळा निर्माण झाला. ऐन हंगामात आलेल्या या बंदीने शासकीय यंत्रणांची झोप उडाली होती. बंदी उठविण्यासाठी इंग्लडच्या संसदेतही आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर "व्हेपरी ट्रीटमेंट'द्वारे आंबा युरोपमध्ये निर्यातीस परवानगी मिळाली. त्यानंतरही युरोप वारीत दरवर्षी कोणता ना कोणता अडथळा निर्माण होत आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणात आंबा युरोपला जात असल्याने उष्णजल प्रक्रियेची व्यवस्था रत्नागिरी, सिंधुदुर्गतील पॅक हाउसमध्ये करण्यात आली आहे. रत्नागिरीतील पणन विभागाच्या पॅक हाउसमध्ये उष्णजल प्रक्रिया केली जाऊ शकते. या पॅक हाउसला ना हरकत देण्याची जबाबदारी क्‍वारंटाइन विभागाची आहे. त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रक्रिया करून आंबा निर्यात करता येऊ शकतो.

थंडी वाढल्याने काढणी लांबली
जागतिक हवामान बदलामुळे उत्पादन घटत आहे, तर नोटाबंदीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे. खिशात पैसा खेळता नसल्याने हा परिणाम झाला आहे. या कारणांमुळे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी हापूसचे भाव 600 ते 700 रुपयांनी घटले आहेत. घाऊक बाजारात 250 ते 800 रुपये भाव असून, किरकोळ दर 500 ते 1500 रुपये डझन असे भाव आहेत. महाशिवरात्रीला सलग आठ दिवस उष्मा वाढल्याने कमी दर्जाचा आंबा बाजारात दाखल झाला. दर्जा घसरल्याने परदेशी वारीवर परिणाम होईल, अशी भीती होती. पुन्हा थंडी वाढल्याने आंबा तयार होण्याचे प्रमाण घटले. काढणी लांबली आहे, असे आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: noc problem in hapus export