मुंबईतील इंद्रधनूचे 'विभवान्तर' प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

राजापूर ः दमदार अभिनय आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर मुंबईच्या इंद्रधनू संस्थेच्या "विभवान्तर' या एकांकिकेने तालुक्‍यातील ओणी येथील ओणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या (कै.) जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेवर नाव कोरले. वैयक्तिक बक्षिसांमध्ये "फायनल डिसिजन' या एकांकिकेने बाजी मारली. विजेत्यांना अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते 21 हजार रुपये, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत रत्नागिरी-गणेशगुळे येथील चतुरंग प्रॉडक्‍शन संस्थेची "पुरुषार्थ' आणि पुणे येथील समर्थ ऍकडॅमीची "सेकंण्ड हॅण्ड' यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटाकाविला. या दोन्ही संस्थांना अनुक्रमे 15 हजार आणि 10 हजार रुपये, शिल्ड आणि प्रमाणपत्र देण्यात आले. बक्षीस समारंभ शनिवारी (ता. 24) संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप संसारे, अरविंद गोसावी, प्रदीप लिमये, दीपक पडते, महादेव धुरे, सूर्यकांत तुळसणकर, नामदेव तुळसणकर, संजय वडवलकर, गणपत भारती, सुबोध मूळगावकर, मुख्याध्यापक एम. आर. पाटील आदी उपस्थित होते. परीक्षक डॉ. अनिल बांदिवडेकर यांनी एकांकिकेचे सादरीकरण कशा पद्धतीने करणे गरजेचे आहे, याबाबत माहिती दिली.

वैयक्तिक बक्षिसे
प्रकाशयोजना ः राहुल तारकर (फायनल डिसिजन)
संगीत ः निनाद म्हैसाळकर (सेकंड हॅण्ड)
नेपथ्य ः कविता (रसिक रंगभूमी)
अभिनय ः प्रथम- देवयानी मोरे (सेकंड हॅण्ड)
द्वितीय- हेमंत चक्रदेव (पुरुषार्थ)
तृतीय- मृणाली तांबडकर (द ब्लॅक स्पेस)
चौथा ः स्वप्नील वरेकर (फायनल डिसिजन)
पाचवा ः स्वाती कुळकर्णी (कविता)
लेखन ः प्रथम ः नितीन कांबळे (विटनेस ऑफ लव्ह)
द्वितीय ः सोनल उत्तेकर (फायनल डिसिजन)
दिग्दर्शन ः प्रथम ः सुनील हरिश्‍चंद्र (विभवान्तर)
द्वितीय ः राहुल बेलापूरकर (सेकंड हॅण्ड)