कळंबस्ते 'हॅचरी'तून एकावेळी मिळते लाखाचे उत्पन्न

One time one lac income from hatchery
One time one lac income from hatchery

रत्नागिरी - कुक्‍कूटपालनाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशू विभागाने कळंबस्ते (ता. चिपळूण) येथे कोकणातील पहीला हॅचरी (अंडी उबवणी) प्रकल्प सुरू केला आहे. या केंद्रातून एकावेळी सहा हजार अंडी उबवण्यात येतात. त्यातून किमान पाच हजार पिल्ले उपलब्ध होत आहेत. एका बॅचला एक लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. यातील कोंबडीची पिल्ले अनुदानावर महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत, अशी माहीती पशू अधिकारी डॉ. सूभाष म्हस्के यांनी दिली.

कोकणात कुक्‍कूटपालन व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. त्यातून उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. हे रत्नागिरी जिल्हापरिषद पशू विभागाने दाखवून दिले आहे. पशूसंवर्धन विषयक सेवा पुरवण्याच्या बदल्यात जिल्हा परिषदेकडे आठ लाख रुपये जमा झाले होते. त्या सेवाशुल्कातील साडेपाच लाख रुपये खर्च करुन कळबस्तेत हॅचरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. एकाचवेळी 6 हजार 60 अंडी उबवता येतील अशी व्यवस्था आहे. सध्या बाजारात मागणी असलेल्या गिरीराज आणि वनराज या दोन जातींच्या पिल्लांचे उत्पादन घेतले जात आहे. आतापर्यंत दोन बॅचमधून दहा हजार कोंबडीची पिल्ले बाहेर पडली आहेत. तिसरी बॅच येत्या काही दिवसांमध्ये बाहेर पडेल. कोंबडी पिल्ले अन्यत्र 40 रुपये एक असे विक्री केले जाते. शासकीय केंद्र असल्याने सवलतीच्या दरात 20 रुपयाला एक पिल्लू दिले जाते. एका बॅचमागे एक लाख रुपयाचे उत्पन्न पशू संवर्धन विभागाकडे जमा होत आहे.

या प्रकल्पाचे उद्‌घाटन पंधरा दिवसांपूर्वी महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. कुक्‍कूटपालन व्यवसाय करण्यास इच्छूक असलेले बचत गट, शेतकरी यांना येथील पिल्ले दिली जात आहेत. गेल्या महिन्याभरात उत्पादन मिळू लागले आहे. या केंद्रावर झालेला खर्च अल्पावधितच भरुन निघणार आहे. यातून भविष्यात लाखो रुपयांचे उत्पन्न पशू संवर्धन विभागाला मिळणार आहे. स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा प्रकल्प उपयुक्‍त ठरेल आहे. येथे पाच कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यात आणखीन एक अंडी उबवणी केंद्र सुरु करण्याचा विचार असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

पिल्ले पन्नास टक्‍के अनुदानावर
अंडी उबवणी केंद्रातील पिल्ले पन्नास टक्‍के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. पाचशे जणांसाठी पाच लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची ही संकल्पना आहे. यामध्ये महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. पाचशे रुपयांची पिल्ले आणि पाचशे रुपयांचे खाद्य लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com