कणकवलीतील टेंबवाडी मार्ग खुला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

कणकवली : शहरातील टेंबवाडी येथील रस्ता गेले दोन महिने बंद होता. आज नगरपंचायतीने स्थानिक जमीन मालकांशी चर्चा करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्‍त झाले. नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी रस्ता खुला करण्यासाठी टेंबवाडी येथे येऊन स्थानिकांशी चर्चा केली.
 
कणकवली शहराच्या नगररचनेमधील भालचंद्र महाराज आश्रम ते टेंबवाडी आणि तेथून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता मे महिन्यात बंद झाला होता. टेंबवाडी येथे काही जमीन मालकांनी खड्डा खोदून हा रस्ता बंद केला होता. यामुळे टेंबवाडीसह शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. दुचाकी व इतर वाहनचालकांना तब्बल एक ते दीड किलोमीटरचा फेरा मारून बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्गावर यावे लागत होते. हा रस्ता खुला करावा यासाठी टेंबवाडीतील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
 
टेंबवाडी रस्ता खुला करण्याबाबत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह मुख्याधिकारी श्री. तावडे यांनी गेले दोन दिवस येथील स्थानिक जमीन मालकांशी चर्चा केली होती. या जमीन मालकांच्या संमतीनंतर आज सकाळी अकरा वाजता टेंबवाडी रस्ता खुला करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. या रस्त्याच्या मध्यभागी असलेले झाड, कुंपण, मातीचा भराव आदी जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले. सध्या या रस्त्यावर चिखल असल्याने तेथे खडीकरण, गटार आदी कामे झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे. ही कार्यवाही येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्‍वास मुख्याधिकारी श्री. तावडे यांनी व्यक्‍त केला.