'पीव्हीसी'ची खातरजमा करण्यासाठी तारापूर पोलिसांचे प्रयत्न

नीरज राऊत
मंगळवार, 11 जुलै 2017

पालघर - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पालगतच्या क्षेत्रात प्रवेशासाठी आवश्‍यक "पीव्हीसी' (चारित्र्य वर्तणुकीचा दाखला) प्रमाणपत्र देण्यात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या ढिसाळपणाचा पर्दाफाश झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रमाणपत्रांची खातरजमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पालघर - देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पालगतच्या क्षेत्रात प्रवेशासाठी आवश्‍यक "पीव्हीसी' (चारित्र्य वर्तणुकीचा दाखला) प्रमाणपत्र देण्यात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या ढिसाळपणाचा पर्दाफाश झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रमाणपत्रांची खातरजमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अणुऊर्जा प्रकल्पातील "आयएनआरपी' प्रकल्पासाठी "पीव्हीसी' सर्टिफिकेट काढले जाते; मात्र प्रकल्पठिकाणी वास्तव्य करीत असल्याच्या केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे "पीव्हीसी' मिळविले जात होते. केंद्रात प्रवेशासाठी पास घेण्यासाठी आवश्‍यक "पीव्हीसी' मिळविण्यासाठी आपल्या मूळ गावचा पत्ता, स्वतःचे छायाचित्र असलेले प्रतिज्ञापत्र पुरेसे असल्याचे "सकाळ'ने उघडकीस आणल्यानंतर आज (ता. 10) पोलिस यंत्रणेने "पीव्हीसी' सर्टिफिकेटची खातरजमा करण्याचे काम सुरू केले.

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांचे संपूर्ण नाव, त्याचा मूळ निवासी पत्ता, आधारकार्ड क्रमांक नोंदवून पोलिसांच्या पडताळणी फॉर्म "ब'प्रमाणे माहिती नोंदवून प्रत्येक कंत्राटी कामगाराच्या जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. या माहितीच्या फॉर्म "ब'च्या तीन प्रतींपैकी एक प्रत बीएआरसी व ठेकेदाराला देण्यात येऊन संबंधित कामगाराच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती मर्यादित कालावधीत मागविण्यात आली आहे.

स्थानिकांना "पीव्हीसी' देताना संबंधितांवर असलेल्या गुन्ह्यांची माहिती "पीव्हीसी'वर उल्लेखित केली जात असल्याने अनेक स्थानिकांना कामापासून मुकावे लागले आहे; मात्र कोणत्याही प्रकारच्या पडताळणीशिवाय परप्रांतीयांना प्रतिज्ञापत्राच्या आधारे "पीव्हीसी' देणे अन्यायकारक झाल्याची भावना स्थानिकांमध्ये झाली आहे. सध्या केवळ संशयाने वा कोणताच ठोस पुरावा नसताना स्थानिक तरुणांवर गुन्हे दाखल केले जाताना "बीएआरसी'चे "आयएनआरपी' प्रकल्प हा परप्रांतीयांचे माहेर व आश्रयस्थान झाले आहे, असा आरोप घिवली येथील गुलाब विष्णू तामोरे यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

त्या कामगारांवर गुन्हे
ज्या कामगारांची तारापूरपूर्वीच्या ठिकाणांची माहिती व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी निश्‍चित कालावधीत उपलब्ध न झाल्यास अशा कामगारांना हमीपत्र व प्रतिज्ञापत्राच्या आधारावर देण्यात आलेल्या "पीव्हीसी' रद्द करून खोटी व चुकीची माहिती पुरविल्याच्या कारणांवरून गुन्हे दाखल करण्याचे विचाराधीन असल्याचे तारापूर पोलिसांनी सांगितले.