पाली नगरपंचयतीचे स्वप्न तुर्तास भंगले.....

पाली, ग्रामपंचायत कार्यालय.
पाली, ग्रामपंचायत कार्यालय.

पाली - पाली मध्ये नगरपंचायत होणार की ग्रामपंचायत राहणार याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. मात्र बुधवारी (ता.26) तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकींसोबत पाली ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पालीकरांचे नगरपंचयतीचे स्वप्न तुर्तास तरी भंगले आहे. परिणामी सर्वांचेच लक्ष पाली ग्रामपंचायतीवर लागले आहे. 

पाली नगरपंचायत व्हावी व गावाच्या विकासाठी सर्व पक्षीयांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. तसेच काही नागरिकांनी नगरपंचायत व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  मात्र अपक्ष उमेदवारांनी नगरपंचायत होण्याच्या किचकट व वेळखाऊ प्रक्रियेला कंटाळून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकास करण्याच्या हेतुने पाली ग्रामपंचायत निवडणुक लढविण्याचा निर्धार केला.  अपक्ष उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुक लढविण्याची शेवटपर्यंत ठाम भुमिका ठेवली. त्यामुळे निवडणुकी पूर्वीच पाली ग्रामपंचायतीवर तब्बल अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

अवघ्या दोन वार्डात चार उमेदवारांमध्ये लढत
पाली ग्रामपंचायतीच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी निवडणूक होणार होती. मात्र 11 अपक्ष उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पाली ग्रामपंचयतीच्या इतिहासात पहिल्यांदाच फक्त दोन वार्डात निवडणुका होणार आहेत. यासाठी चार उमेदवार आमने-सामने उभे आहेत.

सरपंचपदासाठी अनुसुचित जमातीकरीता आरक्षण जाहीर झाले असून सरपंच व सदस्य पदासाठी प्रभाग क्र. 2 मध्ये ओमकार जाधव व गणेश बालके यांच्यात लढत होणार आहे. याबरोबरच प्रभाग क्र. 5 मध्ये सर्वसाधारण एका जागेसाठी बल्लाळ पुराणिक व विजय मराठे या दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. वार्ड क्रमांक 3, 4 व 6 मध्ये ओबीसी महिला आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये एससी सर्वसाधारण या जागांवरील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या चार जागा रिक्त आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार सध्या घरोघरी जाऊन विकासाच्या मुद्यावर प्रचार करत आहेत.

ग्रामपंचायतीचा कार्यभार किती काळ?
उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचे उपसचिव कैलास बावधाने यांच्या उपस्थितीत येत्या 3 महिन्याच्या कालावधीत पाली नगरपंचायत होणे कामी प्रशासनाने आवश्यक ते प्रस्ताव व प्रक्रीया पुर्ण करावी असे आदेश दिले असल्याचे समजते. उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत सोमवारी (ता.24) मिळण्याची शक्यता आहे. मात्र पाली नगरपंचायत प्रस्थापित व्हावी या निकलावरुन जर पुन्हा कोणी ग्रामपंचायत राहण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास मोठाच पेच उभा राहणार आहे. त्यामुळे पाली ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती काळ टिकेल व पाली नगरपंचायतीचा कारभार केव्हा सुरु होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजुन तरी शासनाकडून पाली नगरपंचायती संदर्भात कुठलेच निर्देश किंवा पत्र आलेले नाही. त्यामुळे पाली ग्रामपंचायत निवडणूका नियोजित वेळा पत्रकानुसार पार पडणार आहेत. आगामी काळात नगरपंचायती संदर्भात शासनाचे जे आदेश किंवा सुचना येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.
- महेश गबाडी, प्रशासक, पाली ग्रामपंचायत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com