पॅनकार्ड विरोधात बेमुदत ठिय्या

पॅनकार्ड विरोधात बेमुदत ठिय्या

मालवण : पॅनकार्ड क्‍लब्ज्‌ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज तालुक्‍यातील एजंट तसेच ठेवीदारांनी कंपनीच्या येथील हॉटेल सागर किनारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी ठेवीदारांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या दोन्ही हॉटेलमध्ये जात पर्यटक व ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास अटकाव केला. सायंकाळी उशिरापर्यत हे आंदोलन सुरू होते.

पॅनकार्ड क्‍लब्ज लिमिटेड या कंपनीत जिल्ह्यातील 25 हजाराहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे 40 कोटीच्या ठेवी आहेत; मात्र गेल्या दीड वर्षापासून कंपनीचे सर्व व्यवहार व परतावा रक्‍कम बंद झाल्याने ठेवीदारांसह मार्केटिंग एजंट हवालदिल झाले आहेत. काही दिवसापूर्वी सावंतवाडी तालुक्‍यातील ठेवीदारांनी तीव्र आंदोलन केले होते. या पार्श्‍वभूमीवर आज शहरातील पॅनकार्ड समूहाच्या हॉटेल सागर किनारा येथे सुमारे 300 ते 400 ठेवीदार व एजंट यांनी धडक देत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले. आम्हाला तारखा नको, जमा केलेली रक्‍कम मिळाली पाहिजे, असे सांगत कंपनीच्या दोन्ही हॉटेलमध्ये ठेवीदार तसेट एजंटांनी ठाण मांडले. तेथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच ग्राहकांना अटकाव केला. आंदोलनाच्या ठिकाणी कंपनीच्या एकाही अधिकाऱ्याने संपर्क किंवा भेट घेतली नाही, असे ठेवीदारांनी सांगितले. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

गेली काही वर्षे पॅनकार्ड समूहाच्या माध्यमातून मार्केटिंग एजंटाद्वारे जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांनी 40 कोटीहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. अनेक ठेवीदारांची ठेवीच्या मुदतीची तारीख उलटून गेली तरी ठेवीच्या रक्‍कमा गेल्या दीड वर्षापासून संबंधितांना मिळालेल्या नाहीत. कोट्यावधी रुपयांचा परतावा मिळत नसल्याने ग्राहक संतप्त बनले आहेत. नव्या ठेवीदारांनी कंपनीत पैसे भरण्यास नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कंपनीतील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नाही. काही ठराविक अधिकारी केवळ चर्चा करतात. पैसे मिळतील, ठेवीदारांची यादी द्या असेच गेले काही महिने सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळेच तालुक्‍यातील ठेवीदार व एजंटांनी आठ दिवसापूर्वी याप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
 

आज छेडण्यात आलेल्या या आंदोलनाची कल्पना यापुर्वी कंपनीच्या सर्व अधिकारी यांना देण्यात आलेली होती, तरीही कोणीही चर्चेसाठी पुढाकार घेतला नसल्याने नाराज गुंतवणूकधारांनी आपले आंदोलन सुरू केले. जोर्पंयत कंपनीकडून गुंतवणूकदारांचे सर्वच्या सर्व पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनाची माहिती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आली होती असेही गुंतवणूकदारांनी स्पष्ट केले. सनदशिरमार्गाने आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 

यावेळी अवधूत चव्हाण, नाना कुमठेकर, मेघा गावकर, मिलींद कडू, आशू परब, प्रमोद नाईक, डी. के. चव्हाण तसेच इतर गुंतवणूकदार उपस्थित होते. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील सुमारे 450 ते 500 गुंतवणूकदार उपस्थित होते. हॉटेलच्या पायऱ्यांवर पायऱ्यांवर उभे राहून गुंतवणूकदारांनी घोषणाबाजी केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला होता. शहरात पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांनीही आंदोलन शांततेने करणार असल्याचे सांगितले.
 

दरम्यान, हॉटेलमध्ये राहण्यासाठी काही ग्राहक यावेळी याठिकाणी आलेले होते. गुंतवणूकदारांनी आपल्या आंदोलनाची माहिती देत त्यांनी हॉटेलमध्ये न उतरविण्याची विनंती केली. यावेळी ग्राहकांनीही प्रतिसाद देत माघारी जाणे पसंत केले. तसेच हॉटेलमध्ये उतरलेल्या व्यक्‍तींना आंदोलन संपल्यानंतर जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. हॉटेल मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे द्यावे आणि मगच आपला व्यवसाय करावा अशी सूचना यावेळी करण्यात आली. जिल्हातील सुमारे 15 हजार गुंतवणूकदारांचे 40 कोटी रूपये कंपनीकडून येणे आहे. असे असताना गुंतवणूकदारांनी संयमी भूमीका बजावली आहे. हॉटेलच्या बाहेर आक्रमकपणे घोषणा दिल्या जात होत्या; मात्र आतमध्ये गेल्यानंतर गुंतवणूकदार शांतपणे बसून आपले ठिय्या आंदोलन करत होते. गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यांवर आपले अडकलेले पैसे कधी मिळणार याची आशा दिसून येत होती. मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची चर्चा आंदोलकांशी करण्यात आलेली नव्हती.


पॅनकार्ड कंपनीने आमच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलीसात तक्रार दिल्यास आम्ही आक्रमकपणे आंदोलन सुरू करू. आज पाचशेपेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित आहेत. उद्यापासून यांची संख्या वाढत जाणार आहे. जोपर्यंत कंपनीकडून ग्राहकांचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार आहोत असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
 

हॉटेल उघडताच फुल्ल झाले पण...
सकाळी हॉटेलची दारे ग्राहकांसाठी उघडल्यानंतर काही क्षणातच समूहाने अनेकजण टेबलांवर येवून बसू लागले. काही वेळात हॉटेल फुल झाल्याने तसेच एवढे ग्राहक अचानक आल्याने कर्मचारी वर्ग बुचकळ्यात पडला. मात्र काही वेळाने गुंतवणूकदारांनी सर्व खुर्च्याचा ताबा घेत आपले सायंकाळपर्यत आंदोलन असल्याचे स्पष्ट केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com