पूर्णगड - बुडालेल्या नौकेतील मृतदेहांच्या शोधासाठी थांबलेले ग्रामस्थ.
पूर्णगड - बुडालेल्या नौकेतील मृतदेहांच्या शोधासाठी थांबलेले ग्रामस्थ.

पूर्णगड खाडीत नौकेला जलसमाधी; चार बुडाले

दोन मृतदेह हाती, दोन बेपत्ता - दुर्घटनेत सापडले तीन सख्खे भाऊ

पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड खाडीच्या मुखाशी छोट्या मच्छीमार नौकेला (बोटले) जलसमाधी मिळाली. सोमवारी (ता. ११) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बोटलीतील चौघे खलाशी बेपत्ता झाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह आज सकाळी सापडले. पूर्णगड येथील तिघा सख्ख्या भावांवर ही आपत्ती ओढवली. त्यामुळे या भागात हळहळ व्यक्त होत आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. भरतीच्या लाटांच्या तडाख्यात सापडल्याने बोटली बुडाल्याची ही दुर्घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

जैनुद्दीन लतिफ पठाण (वय ४५, रा. पूर्णगड-नवानगर) यांच्या मालकीची आयशाबी (आयएनडी, एमएह४ एमएम२९८१) ही मच्छीमारी छोटी नौका (बोटले) आहे. 

अनेक वर्षे ते मच्छीमारीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे कालदेखील ते सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्णगड खाडीमार्गे मासेमारीसाठी समुद्रात गेले. जैनुद्दीन पठाण यांच्यासह भाऊ हसन लतिफ पठाण (६२), अब्बास लतिफ पठाण (४८) आणि तवक्कल अब्दुल सतार बागी (३२) हे सोबत होते. मासेमारी करून मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास परतत होते. पूर्णगड खाडीच्या मुखाशी ते आले तेव्हा वादळी वातावरण होते. समुद्राला उधाण आले होते. त्यामुळे लाटांशी चार हात करीत ते मुखापर्यंत आले होते; परंतु अजस्र लाटेच्या तडाख्यात मच्छीमार नौका उलटल्याने तिला जलसमाधी मिळाली. मासेमारी करणाऱ्या काही नौका या परिसरात होत्या. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. बोटलीवरील जैनुद्दीन पठाण, हसन पठाण, अब्बास पठाण आणि तवक्कल बागी हे बेपत्ता झाले होते.

प्रशासन व मच्छीमार यांनी त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जैनुद्दीन पठाण व हसन पठाण या सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले. अन्य दोघे अजून बेपत्ता आहेत. भरतीची वेळ होती, त्यामुळे शोधमोहिमेत अडथळे निर्माण होत होते. मृतदेह शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेने पठाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पूर्णगड सागरी पोलिस, आरोग्य विभाग, तहसीलदार, बंदर अधिकारी आदी यंत्रणा घटनास्थळी सक्रिय आहेत.

बुडालेली नौका जेटीवर आणली
गावखडी येथील जयदीप तोडणकर व अब्बास बंदरकर यांनी लाटांचा मारा सहन करीत बुडालेली नौका शोधून काढून जेटीवर आणून ठेवली. त्याबद्दल त्या दोघांचे सर्वांनी आभार मानले. गस्ती नौका आपल्या यंत्रसामग्रीचा अवलंब करून मृतदेहाचा शोध घेत आहेत.

गाळ न काढल्याने दुर्घटना
पूर्णगड खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. खाडीत शिरताना यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. म्हणून स्थानिक मच्छीमारांनी खाडी मुखातील गाळ काढण्यासाठी संबंधित यंत्रणांना निवेदनही दिले आहे; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गाळ न काढल्याने पुन्हा ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com