पेट्रोल पंपचालकांकडून खरेदी बंद आंदोलन सुरू

Petrol_
Petrol_


कणकवली : पेट्रोल पंप चालकांचे खरेदी बंद आंदोलन आजपासून सुरू झाल्याने जिल्ह्यातील वाहनधारकांना पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनाची तीव्रता वाहनधारकांना माहिती नसल्याने आज सायंकाळपर्यंत पेट्रोल पंपांवर सुरळीतपणे पेट्रोल पुरवठा व विक्री सुरू होती. उद्यापासून (ता.4) मात्र सर्वच पंपांवर टाकी फुल्ल करण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे.


पेट्रोल पंप चालकांच्या मागण्यांची सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांनी फारशी दखल न घेतल्याने आज आणि उद्या पेट्रोल आणि डिझेल खरेदी बंद राहणार आहे. शनिवारी (ता.5) पासून फक्त एकाच पाळीमध्ये विक्री सुरू राहणार आहे. रविवार व सार्वजनिक सुटीदिवशी सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र पेट्रोल ऍण्ड डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार देशभरातील पेट्रोलियम डिलर्सचे आंदोलन 19 ऑक्‍टोबरपासून पासून सुरू आहे. या आंदोलनाचा भाग असलेल्या पंपावरील ब्लॅक आऊटला 100 टक्के प्रतिसाद आहे. त्यामुळे आज (ता.3) आणि उद्या (ता.4) पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आहे. परिणामी साठा असेपर्यंत ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल पंपांवर उपलब्ध होणार आहे. नवीन साठा येईपर्यंत टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पंप चालकांच्या आंदोलनाकडे गंभीरतेने न पाहिल्यास सर्वच पंपांवर पेट्रोल उपलब्धतेनंतर प्रचंड रांगा लावून पेट्रोल आणि डिझेल घेण्याची वेळ येणार आहे.
यापूर्वी 19 ऑक्‍टोबरला फक्त पंधरा मिनिटांचा ब्लॅकआऊट घेण्यात आला होता. त्यामुळे वाहनधारकांची फारशी गैरसोय झाली नव्हती. आता दोन दिवस पेट्रोल-डिझेलची खरेदी बंद असल्याने त्यापुढील दोन ते चार दिवस पेट्रोल-डिझेल पुरवठाही ठप्प राहण्याची शक्‍यता आहे.


पेट्रोलियम डिलर्सनी शासन आणि पेट्रोलियम कंपन्यांकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये दरवर्षी 1 जानेवारी व 1 जुलै रोजी डीलर कमिशनची समीक्षा करणे, डीलरला होणाऱ्या पेट्रोल व डिझेलमधील घट याचे प्रमाण वाढवणे (पेट्रोल 0.59 टक्के ऐवजी 0.75 टक्के व डिझेल 0.20 टक्के ऐवजी 0.25 टक्के), डिलर्सने पेट्रोल पंपासाठी वापरलेल्या निश्‍चित मालमत्तेच्या मूल्याचे 1997 पासून समीक्षण झालेली नाही, ती तत्काळ करून डिलर्सच्या भाडेपट्टीमध्ये वाढ करावी व योग्य मोबदला द्यावा, पेट्रोल पंपाच्या ग्राहकांना उपलब्ध सोयीसुविधा आणि स्वच्छतागृहांसाठी दर निश्‍चित करून द्यावेत आदींचा समावेश आहे.

सार्वजनिक सुटीदिवशी पंप बंद
पंप मालकांनी शनिवार (ता.5) पासून एकाच पाळीमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी सहा ते सायंकाळी सहा किंवा सायंकाळी सहा ते पहाटे सहा यापैकी एकाच पाळीत पेट्रोल विक्री सुरू राहणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात सार्वजनिक सुटीदिवशी पंपही बंद राहणार आहेत. यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारसह सर्व रविवार आणि इतर शासकीय सुट्ट्यांनाही पंपावरील व्यवहार बंद राहणार आहेत. याचा मोठा फटका ग्राहकांसह वाहनधारकांना सहन करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com