विकासासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन हवे 

विकासासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन हवे 

मालवण - केवळ रस्ते, पाण्याची सुविधा उपलब्ध झाली म्हणजे गावचा विकास झाला असे नाही तर गावच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगार निर्मिती, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण, बालकल्याणची साधने या सर्वांची सांगड घालणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सुरवातीपासूनच नियोजन व्हायला हवे. गाव विकासाचा आराखडा केवळ कागदावर न ठेवता शासनाच्या योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज येथे व्यक्त केले. 

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर प्रथमच घेण्यात आलेल्या या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचा एकही सदस्य तसेच पंचायत समितीचे पाच सदस्य अनुपस्थित राहिल्याने त्यांना गाव विकासाची आस्था नसल्याची चर्चा सुरू होती. 

ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन राज्य व्यवस्थापन कक्ष यशदा पुणे व येथील पंचायत समिती यांच्यातर्फे आज येथील दैवज्ञभवन सभागृहात ग्रामपंचायत विकास आराखडा व्यवस्थापन व अंमलबजावणी तसेच सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर यांची तालुकास्तरीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्‌घाटन प्रभारी सभापती अशोक बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, विनोद आळवे, कमलाकर गावडे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, कृषी अधिकारी व्ही. एस. सुतार, प्रमोद नंदनवार, के. टी. पाताडे, पी. डी. जाधव, व्ही. के. जाधव, अभिजित मदने, बाप्पा राणे, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक, भीमसेन पळसंबकर, बांधकामचे उपअभियंता आर. जे. कोकाटे यांच्यासह तालुक्‍यातील सरपंच, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर आदी उपस्थित होते. 

श्री. पराडकर म्हणाले, ""निवडणुकीस उभे राहिलेल्या आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्‍वासन दिलेले असते; मात्र निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींना दिवस, महिने, वर्षे कधी उलटून जातात हे कळतच नाही. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी गावच्या विकासाचे सुरवातीपासूनच नियोजन करायला हवे. केवळ रस्ते, पाण्याच्या योजना एवढेच न करता गावपातळीवर रोजगार उपलब्ध कसा होईल त्याचबरोबर पाणी, शिक्षण, बालकल्याण यासह अन्य योजनांमधून कामे करताना गावचा सर्वांगीण विकास साधायला हवा. पेयजलमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला; मात्र त्यातून चांगली कामे झाली नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी देऊनही जर पाणी योजनेची कामे केली जात नसतील तर पाणीटंचाईत सुचविण्यात येणारी कामे का करायची असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे गाव विकासाचा आराखडा केवळ कागदावरच न ठेवता ती कामे प्रत्यक्षात करण्यावर भर द्यायला हवा.'' 

श्री. बागवे म्हणाले, ""गावच्या विकासात सरपंच व ग्रामसेवक ही रथाची दोन चाके असल्याचे सांगितले जात होते. आता मात्र त्यांच्या जोडीस डेटा ऑपरेटर असल्याने या तिघांनी एकत्रित येत काम केल्यास गावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही."" या वेळी श्री. गावडे यांनी आपले विचार मांडले. 

तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींचा चौदावा वित्त आयोगाचा निधी पडून आहे. योग्य नियोजन नसल्यानेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यातील 64 अंगणवाड्या कुपोषणमुक्त झाल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील अंगणवाड्यांना भेटी देणे आवश्‍यक आहे. लहान मुलांचा बुध्यांक वाढल्यास बौद्धिक विकास होईल आणि बौद्धिक विकास झाल्यास गावचा विकास होईल. नरेगातून तालुक्‍यात आतापर्यंत पावणे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले असून यासाठी ग्रामसेवकांचे चांगले सहकार्य लाभले. तालुक्‍यात 480 एकर क्षेत्रात फळझाड लागवड करण्यात येणार आहे. जी झाडे लोप पावत आहेत त्यांची पुन्हा लागवड करून त्या झाडांचे संवर्धन होणे आवश्‍यक आहे. 
- राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी, मालवण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com