कणकवलीसह तालुक्‍यातही प्लास्टिकमुक्‍ती बासनात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

केवळ घोषणाच - किरकोळ, घाऊक विक्रेत्यांकडे पिशव्यांची उपलब्धता

कणकवली - कणकवली नगरपंचायतीसह तालुक्‍यातील अनेक गावांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. शहरासह अनेक गावे प्लास्टिकमुक्‍त म्हणून जाहीर झाली. परंतु घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेत्यांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहेत. यामुळे प्लास्टिकमुक्‍ती घोषणेपुरतीच उरल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

कणकवली शहर २६ जानेवारी २०१६ रोजी प्लास्टिकमुक्‍त घोषित केले. त्यापाठोपाठ तालुक्‍यातील अनेक गावांनी गतवर्षी मार्चअखेर आपापली गावे प्लास्टिकमुक्‍त झाल्याची घोषणा केली. मात्र वर्षभरात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती राहिली आहे. 

कणकवली नगरपंचायतीने तीन महिन्यांपूर्वी शहरतील दुकाने आणि विक्रेत्यांची तपासणी केली होती. यावेळी ज्यांच्याकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या सापडल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. 

मात्र या कारवाईत सातत्य न राहिल्याने पुन्हा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. शहरालगतच्या गावांमध्येही कमी जाडीच्या प्लास्टिक वापराबाबत गांभीर्य राहिलेले नाही.

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या कणकवली शहर तसेच तालुक्‍यातील पंचक्रोशींच्या बाजारांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडूनही त्या ग्राहकांना दिल्या जात आहेत. 

५० मायक्रॉनपेक्षा जास्त जास्त जाडीच्या पिशव्यांच्या तुलनेत १० ते २० मायक्रॉनच्या पिशव्या स्वस्त पडतात. परंतु या पिशव्या पर्यावरणाला घातक ठरत आहेत. 

गांभीर्य नाही
पन्नास मायक्रॉन पिशव्यांचा पुनर्वापर करता येतो. परंतु कमी जाडीच्या पिशव्या एकदाच वापरून त्या फेकून दिल्या जातात. खराब भाजीपाला, फळे व इतर साहित्य या पिशव्यांत भरून उकिरड्यावर किंवा कचरा कुंड्यांत फेकला जातोय. या पिशव्या मोकाट जनावरांकडून चघळल्या जात आहेत. मात्र प्लास्टिक मुक्‍तीची घोषणा करणाऱ्या राजकीय नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच प्रशासनालाही त्याबाबतचे गांभीर्य राहिलेले नाही.

Web Title: plastic free in kankavali tahsil