पोलिसांचा आता ‘क्विक ॲक्‍शन’वर भर - मितेश घट्टे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - कोणतीही घटना किंवा गुन्हा घडून गेल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचण्याची परंपरा मोडीत काढण्यात येणार आहे. गुन्हा घडल्यास तत्काळ दखल घेण्यात येईल. पुढे काय झाले हा विषय गौण; परंतु वेळेवर पोलिस घटनास्थळी पोचले याचेही जनतेला मोठे समाधान असते. त्यामुळे यापुुढे ‘क्विक ॲक्‍शन’वर अधिक भर दिली जाईल, अशी माहिती नूतन अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली. 

घट्टे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागनिहाय कामकाचाची पद्धत समजून घेतली. त्यामध्ये त्यांनी सुधारणा सुचविल्या आहेत. पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाच्या प्रकरणाची माहिती दिली. प्रबोधनात्मक लिखाणाची त्यांना आवड आहे. 

अनेक वृत्तपत्रांमध्ये ते लेखन करतात. बदलती मानसिकता, बदलते सणावरही त्यांनी लिहिले आहे. कऱ्हाडसह अनेक पोलिस ठाण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. शेतकऱ्यांचे आंदोलन असो, सिरियल किलर प्रकरण, सुपारी देऊन खून केल्याचे अनेक मोठे गुन्हे त्यांनी उघडकीस आणले. वाहतूक कोंडीवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पोलिस दलात त्यांचा दबदबा आहे. 

अपर पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर येथील रिक्षा वाहतुकीला शिस्त लावण्याचा त्यांचा विचार आहे. धूम स्टाइलवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. जनतेचा पोलिसांवरील विश्‍वास वाढण्यासाठी ‘क्विक ॲक्‍शन’ प्लॅन केला आहे. लोकांना तत्काळ रिझल्ट मिळणे आवश्‍यक आहे, यापुढे त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.