जिल्हाभर ‘रात्रीस खेळ चाले’

जिल्हाभर ‘रात्रीस खेळ चाले’

कणकवली - ग्रामदैवतांना गाऱ्हाणे घालून प्रचाराला प्रारंभ करणारे उमेदवार आता शेवटच्या टप्प्यात मतदारांना साकडे घालताना दिसत आहेत. पैशाचा खेळही रंगल्याचे चित्र होते. काल रात्री मोठ्या प्रमाणात काही भागांत पैशाचे वाटप झाले. आजही रात्रीस खेळ चालणार असल्याची चर्चा होती. प्रचार थंडावला तरी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू असून यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

जि.प. आणि पं.स.साठी मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही लढती जिल्हाभर लक्षवेधी आणि चर्चेत आहेत. यंदा प्रमुख काँग्रेस आणि शिवसेना- भाजप यांच्यात लढाई असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची चाचपणी आहे. मनसेचे पुन्हा एकदा नशीब आजमावले जात आहे. विजयासाठी बहुतेकांनी वाटेल ते केले आहे. प्रचार काळात जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, वैभव नाईक, माजी खासदार नीलेश राणे या नेत्यांच्या सभा झाल्या. गावबैठका, बाजारपेठ फेऱ्या काढल्या. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या, भ्रष्टाचाराच्या आरोपापासून ते अकार्यक्षमतेचा ठपका आणि भावनिक प्रचारही झाला. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही. शिवसेना- भाजपने काही ठिकाणू छुपी युती करून एकमेकांवर येथेही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील आरोप- प्रत्यारोपाचा काही परिणाम येथेही जाणवणार आहे. निवडून येण्यासाठी वाटेल ते करणारी ही मंडळी पुढील काळात कोणता निर्णय घेणार, याबाबतही आता उत्सुकता आहे. मात्र उद्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची खरी कसरत आहे. याचे खरे नियोजन कालपासून सुरू झाले.

मतदानासाठी परगावात असलेल्या व्यक्तीला आणण्याचे नियोजन सुरू असून आपल्या उमेदवाराला मत मिळावे म्हणून शेवटच्या टप्प्यात सोशल मीडिया प्रभावी ठरत आहेत. निवडणुकीतील मतदानाच्या आदल्या दोन रात्री फारच महत्त्वाच्या मानल्या जातात. रविवारी रात्री १० वाजता प्रचाराची सांगता झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण होते. याची पहिली ठिणगी कलमठ गटात भाजप- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पडली. मात्र इतर मतदारसंघांमध्ये उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हमखास मत मिळविण्यासाठी पुन्हा एकदा साकडे घालताना दिसत होते. पूर्वी याला ‘कंदील प्रचार’ असे म्हटले जात होते. आता ही जागा आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे. काही उमेदवार हमखास मत मिळविण्यासाठी रोख पैसे न देता कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थेट ऑनलाइन पैसे खात्यात जमा करू लागले आहेत. यातून आपले मत पक्के करण्यासाठी सोशल मीडियावर खात्री केली जात आहे. छुप्या प्रचाराची नवीन पद्धत ग्रामीण भागातही पोचली आहे. गेले दोन दिवस यामुळे सोशल मीडिया फारच प्रभावी होता. 

यंदा गट आणि गणामध्ये कार्यकर्त्यांनी आपला सगळा संवाद हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चालविला. त्यामुळे चोख नियोजन झाले. आता उद्याचा दिवस फार महत्त्वाचा मानला जाणार आहे. याच्या नियोजनात कार्यकर्ते असून मतदार यादीनुसार कुठला मतदार कोणत्या गावात राहतो, शासकीय, निमशासकीय नोकरदार कोठे राहत आहेत, मुंबईला गेलेल्या मतदारांना मतदानासाठी बोलावले जात आहे. बाहेरून मतदानासाठी येणाऱ्यांची वाहनाची सोय, काहींना तर प्रवास खर्चही देण्याचे नियोजन सुरू आहे. हा सर्व संपर्कही सोशल मीडियावरूनच सुरू आहे. 

आरक्षण पडल्यानंतर जे संभाव्य उमेदवार होते त्यांनी त्या काळात १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची नावनोंदणी करून घेतली होती. अशा नव्या मतदारांनाही साकडे घातले जात आहे. सोशल मीडिया, एसएमएस याचाही या वेळी प्रचारासाठी वापर करण्यात आला. शेवटच्या टप्प्यात हा वापर आणखी वाढला. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र होते.

कोट्यवधीची उलाढाल
जि.प.च्या ५० आणि पं.स.च्या १०० जागांसाठी तब्बल ४९१ उमेदवार रिंगणात असल्याने या उमेदवारांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अमाप पैसा खर्च केला. निवडणूक आयोगाकडे दिलेला खर्च हा सहा आणि चार लाख मर्यादेचा असल्याने साधारण २० कोटी रुपये अधिकृतपणे खर्च झाले. प्रत्यक्षात मात्र हा आकडा तिप्पट मानला तर किमान साठ कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल निश्‍चितपणे झाली असावी. यामुळे बाजारपेठेतील नोटाबंदीनंतरची मरगळ झटकली गेली आहे. 

मतदारसंघातील नातीगोती 
उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे कितीही धर्मनिरपेक्ष, जातीच्या राजकारण विरहित भासवत असले तरी निवडणुकीत मात्र नातीगोती शोधली जातात. आपल्या समाजाचा, जातीचा, धर्माचा उमेदवार असल्याने त्या त्या समाजातील किंवा जातीतील मतदारांना विशेष करून गाठले जाते. याचबरोबर गावागावांतील नातीगोती, पिढ्यान्‌पिढ्यांच्या पावणेपणाच्या संबंधाची यानिमित्ताने आठवण होते.  

मेजवानीने व्यवसाय तेजीत
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांना जपण्यासाठी गेले २० दिवस गावागावांत शाही मेजवानीच होती. ग्रामीण भागातील हॉटेल, खाणावळींना चांगले दिवस आले होते. चिकन, मटण व्यावसायिक तेजीत होते. उद्या मतदानाच्या दिवशी वडापाव, समोसे, उसळ पाव, शीतपेय यांच्या व्यवसायास तेजी येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com