अर्थक्रांतीचा प्रस्ताव ई-मॉनिटरायझेशनचा!

अर्थक्रांतीचा प्रस्ताव ई-मॉनिटरायझेशनचा!

रत्नागिरी - पैसा हे माध्यम असायला हवे; पण ती वस्तू झाली आहे. कागदाच्या नोटा या इकॉलॉजीच्या मुळावर उठल्या आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी ‘ई- मॉनिटरायझेशन’ची आवश्‍यकता आहे. अर्थक्रांतीचा हाच खरा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यास देशातील अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल, असा विश्वास अर्थक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल बोकील यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे बोकील यांनी सध्याचे अर्थकारण आणि अर्थक्रांतीचा प्रस्ताव यावर तुडुंब गर्दीमध्ये व्याख्यान दिले. या वेळी अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी बोकील यांचा सत्कार केला. तसेच वाचनालयाच्या नव्या ॲपचे अनावरण त्यांनी केले. 

श्री. बोकील यांनी अर्थक्रांतीचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी सध्याच्या अर्थकारणावर प्रकाश टाकला. भारतात शेकडो वर्षांपूर्वीपासून अर्थशास्त्राचा सखोल विचार झाला आहे. यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा होती. 

तो लाचार नव्हता. मात्र आता या  व्यवस्थेत पुष्कळ दोष शिरलेले दिसत आहेत. सध्या देशात ९० ते ९५ टक्के लोक संपत्ती निर्माण व वितरणाच्या क्षेत्रात काम करतात. ३ ते ४ टक्के लोक संपत्तीचे व्यवस्थापन करतात तर १ ते २ टक्के संपत्तीचे नियामक म्हणून काम करतात. मात्र देशातल्या या ९५ टक्के लोकांचा आवाज ऐकला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भारतात अर्थशास्त्राचा सखोल विचार झाला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होती. व्यक्तीला प्रतिष्ठा होती. समाजात उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशी धारणा होती. शेतीला मोठी प्रतिष्ठा होती. व्यापार व नोकरीपेक्षा शेतकऱ्याचा मान मोठा होता. आता चित्र बदलले आहे. नोकरी, व्यापाराच्या तुलनेत शेतकऱ्याची दुरवस्था झाली आहे. ही परिस्थिती नक्की बदलू शकेल; परंतु आपल्याकडे कोणतीही समस्या निर्माण झाली तर लोकांची मानसिकतेतच दोष आहे. त्यामुळे काहीही होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, यात तथ्य नाही. यासाठी व्यवस्थेत परिवर्तन करावे लागेल. मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याबरोबरच सर्व कर रद्द करून बॅंकेतील व्यवहाराच्या आधारावर कर लावणे, यांसारख्या अर्थक्रांतीच्या प्रस्तावाचा त्यांनी आढावा घेतला. ही व्यवस्था बदलताना काय समस्या निर्माण होतील व त्यावर काय उपाय करता येतील, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.

या वेळी ॲड. पटवर्धन यांनी सांगितले की, १८८ वर्षांचे हे वाचनालय सांस्कृतिक चळवळीचे केंद्र बनत आहे. स्वा. सावरकर यांच्या स्पर्शाने ही वास्तू पुनित झाली आहे. त्यामुळे त्यांचे बोकील यांचे विचार रत्नागिरीकरांना ऐकता यावेत, यासाठी आपण दीर्घ काळ प्रयत्नशील होतो. मात्र, निश्‍चलनिकरणाच्या निर्णयानंतर तर बोकील नेहमीपेक्षा दुप्पट व्यस्त झाले. त्यामुळे त्यांची व्याख्यानासाठी वेळ ठरवणे अवघड होते. तरीही आपल्याला ही संधी प्राप्त झाली आहे, अशी भावना ॲड. पटवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com