कासवांच्या गावात घरट्यांना संरक्षण

mandangad
mandangad

मंडणगड - दुर्मिळ सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातील वेळास समुद्र किनाऱ्यावर वन विभाग आणि ग्रामस्थांनी सागरी कासवांची अंडी घरट्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत कासवाचे एक घरटे सापडले आहे. अजून काही घरटी सापडली की 45-55 दिवसांनी त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर ती समुद्रात सोडली जाणार आहेत. तामिळनाडूतील वादळ, ढगाळ हवामान, कडकडीत ऊन या बदललेल्या वातावरणामुळे कासवांचे नेस्टिंग उशिरा होत आहे.

कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूत अंडी घालते. परंतु काही प्राणी ही अंडी काढून खातात. सुदैवाने काही पिल्ले बाहेर आली तर ती समुद्रापर्यंत पोचण्याआधीच त्यांची शिकार होते. आणि जी समुद्रात पोचतात ती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मरतात. त्यामुळे सह्याद्री निसर्ग मित्रने कासवांचे संवर्धन मोहीम चालविली आहे.

कोकण किनाऱ्यावर कासवाची ऑलिव्ह रिडले ही प्रजाती सापडते. कासवाची मादी साधारणतः 120-150 इतकी अंडी घालते. अंडी घातल्यावर रात्री ग्रामस्थ वीरेंद्र पाटील, समीर महाडिक, मोहन उपाध्ये पेट्रोलिंग करतात. समुद्राच्या भरतीच्या रेषेत न येणारी जागा योग्य समजली जाते. अंडी घातलेली जागा योग्य असेल तर त्यांचे संवर्धन तेथेच केले जाते. नसेल तर अंडी संरक्षित भागात ठेवतात. पिल्ले बाहेर पडल्यावर त्यांना सुरक्षित समुद्रात सोडले जाते. दरवर्षी याच कालावधीत कासव महोत्सव साजरा केला जातो.

भारतात पाच जाती...
जगभरात आढळणाऱ्या खाऱ्या पाण्यातील भारतात 5 जाती आढळतात. ओलिव्ह रिडले त्यापैकी एक. कोकण किनारपट्टीवर नोव्हेंबरअखेरीस ते जानेवारीपर्यंत कासवांच्या मादी येतात. रात्रीच्या वेळी भरती रेषेवर सुरक्षित ठिकाणी वाळूमध्ये एक ते दीड फूट खड्डा करून त्यात अंडी घालतात. रिडलेची मादी अंडी घातल्यानंतर समुद्रात निघून जाते ती कधीच परत येत नाही. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर स्वत:हून समुद्राकडे निघून जातात. वेळास येथे ती समुद्रात जाईपर्यंत संरक्षित केली जातात.

तामिळनाडू व कर्नाटकमध्ये आलेल्या वादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे वेळास किनाऱ्यावर अजून कासवांनी अंडी घातली नाहीत. थंडी व उष्णता यामुळे कालावधी बदलतो. अधिक घरटी सापडली की कासव महोत्सवाची घोषणा करू.
- मोहन उपाध्ये, कासव मित्र

या वर्षी कासवांचे अंडी घालणे सर्वच ठिकाणी उशिरा सुरू झाले आहे. मागच्या आठवड्यात वेळासला येथे 140 अंडी सापडली आहेत. त्यांना हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
- एस. वरक, परिक्षेत्र वनाधिकारी दापोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com