गुहागरला परत न येण्याचा त्याचा हट्ट असा खरा ठरला...!

मयूरेश पाटणकर
शनिवार, 20 मे 2017

गुहागर - रविवारी (१४ मे) ‘मदर्स डे’च्या दिवशी आईचा लाडका पुष्कराज कायमचा निघून गेला. गुहागरच्या समुद्रात १२ वर्षांच्या या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चौकोनी सुखी परिवार शोकसागरात बुडाले. अनेकदा गुहागरच्या समुद्रावर फिरायला येणाऱ्या पुष्कराजने ‘या वेळी गुहागरला येण्यापूर्वी आता गुहागरला परत येणार नाही, समुद्रात पोहण्याचा मला कंटाळा आलाय’, असे आईला सांगितले होते. 

प्रा. राजाराम पाटील आष्टा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात नोकरीला आहेत. प्रा. राजमती पाटील पाटण येथील महाविद्यालयात शिकवतात. मुलांच्या शिक्षणासाठी हे कुटुंब कराड येथे राहते. अनेकदा हे कुटुंब गुहागरात येत. पुष्कराज कराड येथील स्विमिंग टॅंकमध्ये नियमित पोहायला जात असे. गुहागर समुद्रात बहिणीला पोहण्याचे धडे देत असे. यावेळी गुहागरला येण्यास पुष्कराजने नाराजी व्यक्त केली; मात्र मावशी, काका आणि त्यांच्या मुलीसाठी गुहागरला जाऊ, अशी समजूत काढल्यावर तो गुहागरला आला.
सर्वांसोबत समुद्रस्नानाचा आनंद लुटणारा पुष्कराज समुद्रात खेचला गेला. खवळलेल्या समुद्रात आेहोटीच्या वेळी जलतरणाचे त्याचे कौशल्य कमी पडले. गुहागरला परत न येण्याचे त्याचे बोल अशा दुर्दैवीरीतीने खरे ठरले. 

पुष्कराज सापडेपर्यंतचा ४८ तासांचा कालावधी वेदनादायी होता. त्याला पोहता येत असल्याने तो परत येईल अशी वेडी आशा होती. शोध घेणाऱ्या स्पीडबोट चालकांनी पैसेही घेतले नाहीत. स्थानिक ग्रामस्थ, पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्याचे भानही आम्हाला नव्हते. 
- राजाराम पाटील, बहे, ता. वाळवा, जि. सांगली