सायकल हेच बनलेय राहुलचे भावविश्‍व!

सायकल हेच बनलेय राहुलचे भावविश्‍व!

गुहागर - सध्या शहरात एका सजविलेल्या सायकलचे कौतुक सुरू आहे. एका अल्प बुद्धीच्या परंतु, मेहनती मुलाने ही सायकल अनेक जुगाड करून बनविली आहे. त्याच्या आवडीला, कल्पनेला शहरवासीय दाद देत आहेत. या सायकलवेड्या मुलाने गेले वर्षभर पैसे साठवून स्वखर्चाने ही सायकल सजविली.

या मुलाचे नाव राहुल बावधनकर. व्याडेश्वर मंदिराजवळ घर असलेल्या रवींद्र बावधनकरांचा राहुल मोठा मुलगा. लहानपणी मेंदूला कमी रक्तपुरवठा होत असल्याने त्याला फिट येत असत. सातवीपर्यंत फिट येत असल्याने त्याचे शिक्षणही अर्धवट राहिले. तरीही त्याला व्यवहारज्ञान आहे. आता पूर्णपणे बरा झालेला राहुल वडिलांचा गाडी व्यवसाय तो सांभाळतो. गुहागर-चिपळूण-गुहागर अशी गाडी चालवताना आवश्‍यक असणारे पैशाचे सर्व व्यवहार करतो. वडीलही त्याला कौतुकाने वेतनवजा पॉकेटमनी देतात. राहुलचे मन कायम सायकलमध्ये गुंतलेले असते. रोज कामावरून घरी आल्यावर तो कितीही दमला असला, तरी रात्री एक सायकलची फेरी मारतोच मारतो. राहुलने वडिलांकडून मिळालेले पैसे साठवले. त्यातून लायटिंग, डायनॅमो, छोटा हेडलाईट, बॅटरीवर चालणारी बेल, लायटिंगसाठी आवश्‍यक असलेल्या १५ वॅटच्या चार बॅटऱ्या असे साहित्य गोळा केले.  इतकेच नव्हेतर गुहागर खालचापाट येथील संतोष मोरे यांच्या सायकलच्या दुकानात जाऊन नव्या स्टाईलची चेसी विकत घेतली.

ती आपल्या जुन्या सायकलला जोडली. संपूर्ण सायकलला रंग दिला. संतोष मोरे देखील राहुलला मदत करीत असत. जवळपास महिनाभराच्या खटपटीतून राहुलने स्वत: ही सायकल तयार केली आहे. गुहागरात सध्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांना भेटून माझी सायकल तुमच्या पिक्‍चरमध्ये घ्या, अशी विनंतीही त्याने केली होती. ही सायकल म्हणजे राहुलचे भावविश्व आहे. 

गेले महिनाभर राहुल विविध प्रकारचे सामान घरी आणत होता. चौकशी केली तर काही दिवसाने सांगेन असे तो म्हणायचा. त्याचं विश्व घर आणि सायकलभोवती फिरते. वडिलांना व्यवसायात तो मदत करतो. त्यामुळे आम्ही देखील तो काय करतोय हे कळूनही त्याला तसे दाखविले नव्हते. ज्या दिवशी त्याने सजवलेली सायकल घरी आणली तेव्हा त्याचा आनंद परमोच्च होता.
- रश्‍मी बावधनकर (राहुलची आई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com