रायगड जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया संपन्न

पाली: जिल्हा स्तरीय समायोजन प्रक्रियेत उपस्थित अतिरिक्त शिक्षक. (छायाचित्र, अमित गवळे)
पाली: जिल्हा स्तरीय समायोजन प्रक्रियेत उपस्थित अतिरिक्त शिक्षक. (छायाचित्र, अमित गवळे)

पाली (रायगड): सन २०१६-१७ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी (ता. २०) संपन्न झाली. अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयात हे समायोजन पार पडले. जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या १२१ अतिरिक्त शिक्षकांपैकी ४१ शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये झाले. उर्वरीत ८० शिक्षकांचे समायोजन विभाग स्तरावर होणार आहे. समायोजन प्रक्रिया प्रत्यक्षात सुरु होण्याआगोदर पासून सकाळ मागील अडीच तीन वर्षा पासून यावर लक्ष ठेवून आहे.

समायोजनाची हि प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाली. या प्रक्रियेत एकूण सहा फेर्या झाल्या. समायोजनास दुपारी एक वाजल्या नंतर सुरुवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत समायोजनाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे दुरवरुन आलेल्या शिक्षकांची गैरसोय झाली. समायोजनाच्या सुरुवातीस कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित शिक्षकांसोबत संवाद साधला व त्यांचे मनोधैर्य वाढविले. तसेच समायोजनाची प्रक्रिया जाणून घेतली. संपुर्ण समायोजन प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी कुठलाही मोठा वाद झाला नाही. उपस्थित शिक्षकांना त्यांना मिळालेल्या शाळांची ऑनलाईन यादी समोर दाखवून त्यापैकी आवडीच्या शाळा निवडण्याची संधी दिली गेली. तसेच यावेळी अतिरिक्त शिक्षकांसोबत शाळेतील मुख्याध्यापक, संस्थाचालक व एका नातेवाईकास उपस्थित राहण्याची व त्यांचा सल्ला घेण्याची मुभा देण्यात आली होती. उपस्थित अधिकारी प्रत्येक शिक्षकांच्या शंका जाणून घेवून त्यांचे यथायोग्य निरसन करुन माहीती देत होते. समायोजन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुरेश आवारी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी, सुनिल सावंत अधिक्षक वेतन पथक, सहाय्यक प्रशासन अधिकारी किरण रावळ, विस्तार अधिकारी संतोष शेडगे, लिपिक अभिजित पालवे, राहुल देशमुख, अशिष गायकवाड, भगवान कंखर, शबाना शेख, जयश्री पाटील, देवेंद्र भगत, रिना पाटील, दिपाली जैतू आणि शिपाई वावेकर यांनी मेहनत घेतली.

२०१६-१७च्या संचमान्यतेवर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शासनाचे विवीध शासन आदेश वापरुन ऑनलाईन पद्धतीने पारदर्शकपणे समायोजन करण्यात आले. समायोजनात आमच्या कार्यालयाने जामा केलेला तपशील तसेच शिक्षकांच्या हरकती व तक्रारीचे निराकरण योग्य प्रकारे झाले. यामुळे समायोजन प्रक्रियेत कोणताही खंड किंवा व्यत्यय आला नाही. पीएनपी कॉलेजने अमुल्य सहकार्य केले. आमचे कार्यालयीन कर्मचारी तसेच मूख्याध्यापक व शिक्षक संघटना आणि उपलब्ध यंत्रणेमुळे समायोजन शांततेत व सुरळीत पार पडले.
- सुरेश आवारी, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, रायगड जिल्हा परिषद

भरलेल्या व शिल्लक जागा
मराठी माध्यम

जिल्ह्यात मराठी माध्यमातील ११८ शिक्षक अतिरिक्त होते. जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या एकूण ७१ जागा रिक्त होत्या. त्यातील ६४ जागा या ग्रॅज्युएट व ७ जागा या अंडर ग्रॅज्युएट शिक्षकांच्या होत्या. यापैकी ४० जागा समायोजनात भरल्या गेल्या. तर उर्वरित ७८ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावर होणार आहे.

उर्दू माध्यम
जिल्ह्यात उर्दू माध्यमाचे एकूण तीन शिक्षक अतिरिक्त होते. या माध्यमाच्या दोन जागा जिल्ह्यात रिक्त होत्या. त्यातील एक जागा समायोजनात भरली गेली असुन एक जागा शिल्लक आहे. तर दोन शिक्षकाचे समायोजन विभागस्तरावर होणार आहे.

मिळेल ती शाळा स्विकारा
ज्या अतिरिक्त शिक्षकाला एकाच शाळेचा पर्याय आला होता. त्यांना मात्र ती शाळा निवडण्या शिवाय दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता. त्याने ती शाळा निवडल्या शिवाय पुढिल प्रक्रिया होऊ शकत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने पदरात पडलेली एकमेव शाळा त्या अतिरिक्त शिक्षकांना स्विकारावी लागत होती. त्यामुळे काही शिक्षक नाराज झाले होते.

कही खूशी कही गम
ज्या अतिरिक्त शिक्षकांना आपल्या तालुक्यात किंवा दुसर्या जवळच्या तालुक्यातील जागा मिळाली ते शिक्षक मात्र खूप आनंदात होते. परंतू ज्या शिक्षकांना दुरच्या तालुक्यातील जागा मिळाली ते नाराज झाले होते. कारण त्यांना इतक्या वर्ष एका शाळेत सेवा करुन आता कुटूंबापासून दुर जावून दुसर्या शाळेत काम करावे लागणार आहे. तसेच पुन्हा तेथे नव्याने कामकाज करतांना अनेक गोष्टिंचा ताळमेळ घालावा लागणार आहे. त्यामुळे असे शिक्षक शाळा मिळूनही नाखूश दिसले.

विभागस्तरावर समायोजन केव्हा ?
ज्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा पातळीवर होत नाही त्यांची निवड विभागीय स्तरावर होते. तो पर्यंत या अतिरिक्त शिक्षकांना आपल्या मुळे अस्थापनेत (शाळेत) अतिरिक्त म्हणून काम करावे लागते. परंतू मागील वर्षी विभाग स्तरावरील समायोजन झालेच नाही. यावर्षी सुद्धा अजुन विभाग स्तरावरील समायोजन केव्हा होणार हे कोणालाच नीट माहित नाही. परिणामी जिल्हा स्तरावर शाळा न मिळालेले अतिरिक्त शिक्षक चिंतेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com